पुणे : बुधवार पेठेत असणा-या एका इलेक्ट्रॉनिक सामानाच्या गोडाऊनमधून 24 लाख 60 हजार किंमतीचे इलेक्ट्रीक सामानाचे बॉक्स चोरणा-या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. युनिट 1 च्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्हयातून एकूण 30 लाख 60 हजार 878 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अक्षयकुमार श्रीमेवालाल सरोज(20), विनयकुमार विरेंद्रनारायण सरोज(20), राहुल रामसजीवन सरोज(20), निरजकुमार मेघाई सरोज(19), सुनिलकुमार शामसुंदर सरोज(24), अरविंदकुमार प्यारेलाल सरोज(20, सर्व रा. उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहे. याप्रकरणी दिपक रमेश वाधवानी(रा.साधु वासवानी चौक) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचे बुधवार पेठेत इलेक्ट्रीक सामानाचे गोडावून आहे. हे गोडाऊन बंद असताना 6 ते 8 जुलै रोजी त्यांच्या गोडाऊनच्या खिडकीची फ्रेम तोडून गोडाऊनमधील 24 लाख 60 रुपयांचे इलेक्ट्रीकल सामानाचे बॉक्स चोरले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडूनही सुरु होता. दरम्यान तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील व पोलीस हवालदार योगेश जगताप, सुधाकर माने यांना आरोपींनी गुन्हा करताना वापरलेला टेम्पो सापडला. त्याच्या चालकाकडे तपास केला असता, त्याने टेम्पोचा वापर त्याच्या उत्तरप्रदेशातील गावाकडील साथीदारांना गुन्ह्यासाठी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना त्याच्या राहत्या घरातून मंगळवार पेठ व पाटील इस्टेट झोपडपट्टीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व माल आणि टेम्पो हस्तगत करण्यात आला. विनयकुमार फियार्दीच्या गोडाऊनमध्ये वर्षभरापुर्वी कामाला होता. त्यामुळे त्याला गोडाऊनची माहिती होती. कामाच्या ठिकाणी झालेल्या वादाचा राग मनात धरुन त्याने चोरीचा कट रचला. चोरी करण्याकरिता वापरलेल्या टेम्पोचा रंग आणी नंबरप्लेट आरोपींनी बदलली होती. यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेम्पो दिसूनही पोलिसांना माग काढता आला नाही. मात्र चोरीझाल्यावर पुन्हा मुळे टेम्पोचाच नंबर टेम्पोवर टाकण्यात आला. टेम्पोचा कलर मात्र तोच होता. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, उत्तम बुदगुडे, हनुमंत माने, पोलीस कर्मचारी सुधाकर माने, रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, तुषार खडके, इरफान मोमिन, प्रशांत गायकवाड, योगेश जगताप, तुषार माळवदकर, हनिफ शेख, बाबा चव्हाण, अनिल घाडगे, संजय बरकडे, वैभव स्वामी, अशोक माने, सुभाष पिंगळे, अमोल पवार, प्रकाश लोखंडे, सचिन जाधव, अजय थोरात, इमरान शेख यांच्या पथकाने केली.
मालकाशी झालेल्या वादातून केली चोरी : पाच जणांना पुण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 5:07 PM