वारजे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला टॅँकर घुसल्याने समोरून येणाºया मोटारीला धडक बसली. यामध्ये मुंबईचे एक कुटुंबीय जखमी झाले आहे.याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक रिकामा गॅस टॅॅँकर चांदणी चौकाकडून वडगावच्या दिशेने जात होता. येथील माई मंगेशकर रुग्णालयासमोर पुलाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर तात्पुरते दुभाजक उभारण्यात आले आहेत. हे दुभाजक टँकरचालकाच्या लक्षात न आल्याने टॅँकर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला घुसला. त्याच वेळी समोरच्या बाजूने मुंबईकडे जाणारी मोटार आल्याने तिला टॅँकरची जोरदार धडक बसली. मोटारीमध्ये चंद्रकांत निवृत्ती काळंगे (रा. बोईसर, पालघर), त्यांच्या पत्नी सुजाता, मुलगा सुयश, वहिनी अंजना व कारचालक प्रशांत वनमाने हे जखमी झाले आहेत. त्यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सुजाता यांची प्रकृती गंभीर आहे. टॅँकरचालक मोहन मुक्ता स्वामी (वय ४२, रा नापोक्कम, तमिळनाडू) याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस कर्मचारी अरुण किटे करीत आहेत.
टॅँकरची कारला धडक , मुंबईतील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 6:31 AM