सहकारनगर - दहा वर्षांचा मुलगा ते ६५ वर्षीय आईसह कोतकर कुटुंबातील पाच जणांनी कोरोनावर मात केली. घरातच राहून डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन त्यांनी कोरोनाला हरविले आहे. रुग्णालयात न जाता आणि न घाबरता घरीदेखील कोरोना बरा होऊ शकतो, हेच यातून दाखवून दिले आहे.
कुटुंबातील सर्वच सदस्यांना खोकला, सर्दी, अंगदुखी आदी लक्षणे आढळून आली होती. कुटुंबातील तेराही सदस्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यातील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात संदीप कोतकर व त्यांची पत्नी, मुलगा, मुली आणि ६५ वर्षीय आई पॉझिटिव्ह निघाले. सुमन एकनाथ कोतकर (वय ६५), संदीप एकनाथ कोतकर (वय ४४), शारदा (वय ३८), हेमल (वय १५ वर्षे), जयराज (वय १०) हे कोरोनाबाधित झाले होते.
याबाबत डॉ. संजय राजकुंटवार यांचा वेळोवेळी सल्ला घेतला. आमच्या ऑक्सिजनबद्दल त्यांनाही माहिती दिली. त्यानुसार ते आम्हाला उपचार करायचे. योग्य आहार आणि औषधोपचार करून आम्ही घरीच कोरोनाला हरविले.
घरामध्ये सतत सकारात्मक विचार ठेवले आणि आपण कोरोनावर मात करू, असा निश्चय केला होता. त्यानुसार घरातील सर्वजण याप्रमाणे वागले आणि आता ते कोरोनामुक्त आहेत.