आंबेगाव तालुक्यातील भराडी येथील नवरदेव नितीन कांताराम कुरकुटे यांच्यासोबत लग्नाचा बनाव करून नवविवाहितेने सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने चार जिल्ह्यांतून पाच जणांना अटक केली आहे. तत्काळ केलेल्या या कारवाईमुळे मंचर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
15 फेब्रुवारी रोजी नितीन कुरकुटे यांच्याशी लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण( रा. परभणी) यांनी लग्न केले. लग्न जमवण्यासाठी मध्यस्थाने दीड लाख रुपये घेतले. लग्न झाल्यानंतर सात दिवसांनी नववधू लक्ष्मी हिने पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे जेथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला ते घर एका दिवसासाठी भाड्याने घेण्यात आले होते. कुरकुटे यांना या टोळीकडून फसविण्यात आले होते. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक अजित मडके, पोलीस नाईक राजेंद्र हिले, पोलीस जवान योगेश रोडे, सुनीता बटवाल, वैशाली बिडकर, रेश्मा घाडगे, शर्मिला होले यांच्या पथकाने नांदेड, लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये चौकशी केली. मंचरपासून सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटर अंतरावर शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर मंचर पोलिसांना लग्नाचा बनाव करणाऱ्या टोळीचा शोध लागून याप्रकरणी मंचर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये मध्यस्थ नवनाथ महादेव गवारी (रा. मेंगडेवाडी, ता. आंबेगाव), केशव कुंडलिक काळे, सुनीता केशव काळे (रा. नांदेड), गोविंद ज्ञानोबा मुसकवाड (रा. लातूर), व नवरी लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण (रा. परभणी) यांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली आहे.
लग्न लावून नंतर लूटमार करणारी टोळी सक्रिय होती. या अटक केलेल्या आरोपींकडून संपूर्ण राज्यात अजून इतर कोणाला लग्नाचा बहाणा करून फसविण्यात आले आहे का याचा शोध मंचर पोलीस घेत आहे. ही मोठी साखळी असू शकते.या शक्यतेने मंचर पोलिसांकडून अटक केलेल्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद साधून लग्न जमवू नयेत. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणाची अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी केले आहे.