लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : नगरसेवक महेंद्र मल्लाव खून प्रकरणातील मुख्य आरोपी नीलेश ऊर्फ नानू चंद्रकांत कुर्लप याच्या टोळीतील पाच जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी सांगितले. कुर्लप यांच्यासह अटकेत असलेल्या सहा जणांवरील तडीपारीचे प्रस्ताव अटकेत असल्याने प्रलंबित आहेत.तुषार चंद्रकांत भदाणे (वय २८, रा. हुडको कॉलनी, शिरूर), मुकेश ऊर्फ बाबू चंद्रकांत कुर्लप (वय २८), हरीश दादाभाऊ गंगावणे (वय २८), सचिन सतीश मुत्याला वय २८, सर्व रा. कामाठीपुरा, शिरूर) व विशाल शिवाजी वीर (वय २७, भाजीबाजार, शिरूर) या पाच जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, मुकेश कुर्लप वगळता इतर चौघांना पुणे जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे. नीलेश कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप (वय ३२), सनी संजय यादव (वय २०, दोघेही रा. कामाठीपुरा, शिरूर) प्रवीण प्रकाश काळे (वय २४, प्रोफेसर्स कॉलनी, शिरूर), रुपेश हेमंत लुणीया (वय २०, रा. सोनार आळी, शिरूर) व विशाल सुनील काळे (रा. ढोरआळी, शिरूर) हे मल्लाव खूनप्रकरणी अटकेत आहेत. अटकेत असल्याने या सहा जणांचे तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तडीपार केलेल्या व्यक्तींविरोधात वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी ३० सप्टेंबर २०१६ ला अकरा जणांविरुद्ध पुणे जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. हद्दपार (तडीपार) व साक्षीदार यांची चौकशी करून मोरे यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे चौकशी अहवाल पाठविला. हा अहवाल व इतर पुरावे विचारात घेऊन हक यांनी पाच जणांच्या तडीपारीचे आदेश दिले. यानुसार बुधवारी चार जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पुणे जिल्ह्याबाहेर सोडण्यात आल्याचे कुंटे यांनी सांगितले.२८ आॅगस्ट रोजी नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा खून केला होता.या खुनाची पार्श्वभूमी अशी की, मागील वर्षी ३० मे २०१६ रोजी नीलेश कुर्लप याने आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता. यासाठी कुर्लप याची माणसे नगरसेवक मल्लाव यांच्या घरासमोर झाडे लावण्यासाठी खड्डा घेत होती. यावरून कुर्लप व मल्लाव यांचा मुलगा शंतनू यांची भांडणे झाली.यात मल्लाव यांच्या तक्रारीवरून कुर्लप यांना अटक करण्यात आली. वाढदिवसाच्या दिवशी झालेली अटक व यातूनच पुढे वाढत गेलेल्या दुश्मनीचे पर्यवसान मल्लाव यांचा खून होण्यात झाले. काल (३० मे) नीलेश याच्या वाढदिवसाच्या दिवशीच पोलिसांनी त्याच्या सहकाऱ्यांच्या तडीपारीचे आदेश काढून कारवाई केली.
कुर्लप टोळीतील पाच जणांची तडीपारी
By admin | Published: June 01, 2017 1:47 AM