पुणे : कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी रोजी राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने ५ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला आहे. यासाठी राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालय व अधिक्षक कार्यालयातूनही ७०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
कोरेगाव भिमा येथील बंदोबस्तासाठी आज सायंकाळी राज्याच्या विविध भागातील पोलीस बंदोबस्त पुण्यात दाखल झाला आहे. उद्या सकाळी सर्व पाेलिसांना बंदोबस्ताची माहिती देण्यात येणार असून रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरला सायंकाळपासून हा बंदोबस्त सुरु होणार असून तो १ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत राहणार आहे. याबाबत विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी माहिती दिली.
२ अपर पोलीस आयुक्त, ५ पोलीस उपायुक्त, १३ सहायक आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, १९५० अंमलदार, ७०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या ४ कंपन्या. १० बॉम्ब शोधक व नाशक पथके, ६ जलद कृती दलाची पथके, ५ दंगल नियंत्रण पथके असा पुणे शहर पोलीस दलाचा बंदोबस्त असणार आहे.
याशिवाय नवी मुंबई, मुंबई, सीआयडी क्राईम, महामार्ग पोलीस, पुणे, मुंबई रेल्वे पोलीस, औरंगाबाद, पिंपरी, औरंगाबाद पोलीस आयुक्तालय, नाशिक, पालघर, रायगड येथून २ पोलीस उपायुक्त, ५ सहायक आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ७०० पोलीस अंमलदार असा बंदोबस्त आला आहे.
शहरात कडक बंदोबस्त
शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना बुधवारी जारी केल्या आहेत. त्यानुसार, शहरात ३१ डिसेंबररोजी कोठेही नव वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. रात्री ९ नंतर जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात सर्व पोलीस उपायुक्तांना त्यांच्या हद्दीत बंदोबस्त लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला २ सहायक आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, २८ पोलीस उपनिरीक्षक/सहायक निरीक्षक, २८१ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त देण्यात आला आहे.