पुणे : केंद्रीय सुधारित मोटारवाहन कायद्यामध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारणी केली जात आहे. विनापरवाना (लायसन्स) वाहत चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल होत आहे. २४२ जणांना गेल्या महिन्यात प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारणी केली असून, त्यांच्यावर ११ लाख ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. प्रथमच विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांकडून इतका मोठा दंड आकारण्यात आला आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र शासनाने या कायद्याला मान्यता दिली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये या नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सुधारित केंद्रीय मोटारवाहन कायद्यानुसार विनालायसन्स वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा मानण्यात आला आहे. पूर्वी त्याला ५०० रुपये दंड होता. तो आता ५ हजार रुपये करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात अशा २४२ विनालायसन्स वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील १६ जणांनी प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपये दंड भरला आहे. इतर २२६ जणांनी वेगवेगळी कारणे सांगून दंड भरण्यास त्यावेळी नकार दिला. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पावती देण्यात आली आहे.
अनेक वाहनचालक करू लागले विनवणी
लायसन्स नसताना गाडी चालविणे हा गंभीर गुन्हा असून, त्याला ५ हजार रुपये दंड असल्याची यातील अनेकांना माहिती नव्हती. वाहतुकीचा नियम मोडल्यानंतर त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवून लायसन्सची मागणी केली. तेव्हा त्यांनी लायसन्स नसल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांनी त्यांना दंडाची रक्कम सांगितल्यावर अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यातील अनेकांना वाहतूक पोलीस खोटे सांगून आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वाटले. नव्या कायद्यामुळे वादविवाद होणार हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेने सर्वांना सुधारित कायदा व त्यातील पूर्वीचा दंड व आता नवीन दंड याची माहिती देणारा व्हाॅटस्-ॲप पाठविला होता. वाहनचालकांना तो दाखवून हा दंड आम्ही नाही, सरकारने केला आहे. आम्ही फक्त अंमलबजावणी करीत असल्याचे सांगू लागले. काहीजणांनी वाहतूक शाखेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. इतका कधी दंड असतो का, आम्ही इतके पैसे कोठून आणायचे, असे सांगत त्यांना गयावया केली.