सुपे : सुपे (ता. बारामती) येथील उपबाजारात शनिवारी (दि. ३१) झालेल्या या हंगामातील बाजारात अखंड व फोडलेल्या चिंचेच्या सुमारे ५ हजार पोत्यांची आवक झाली; मात्र मागील वर्षीपेक्षा बाजारभावात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाल्याने शेतकरीवर्गात नैराश्याचे वातावरण आहे.
मागील महिन्यापासून या हंगामातील चिंचेच्या बाजाराला सुरुवात झाली. या चालू हंगामात अखंड आणि फोडलेल्या चिंचेच्या सुमारे ३६ हजार ७२९ पोत्यांची आवक झाली. येथील बाजारात जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात चिंचेची आवक होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणलेल्या मालाची रोख स्वरूपात चिंचेची पट्टी मिळावी. यासाठी शनिवार व रविवार दोन दिवस चिंचेचे लिलाव सुरू करण्यात आलेआहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शौकत कोतवाल यांनी दिली. येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मालाचे वजन तातडीने केले जाते. त्यानंतर अकरा वाजता चिंचेचे लिलाव होताच मालाची रोख स्वरूपात पट्टी दिली जात असल्याची माहिती उपसभापती शशिकला वाबळे यांनी दिली. येथील बाजारात बारामतीसह इंदापूर, शिरूर, पुरंदर, हवेली, मावळ, सोलापूर आणि सातारा आदी परिसरातून शेतकरी चिंचविक्रीसाठी आणतात. तर तुळजापूर, बार्शी, लातूर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आदी ठिकाणांहून खरेदीदार व्यापारी येत असतात. मागीलवर्षी चिंचेची सुमारे ५८ हजार १६५ पोत्यांची आवक झाली होती. मागीलवेळी मार्चअखेरीस अखंड चिंचेला सरासरी ३ हजार ३००, तर या वेळी २ हजार ५००, तर फोडलेल्या चिंचेला मागीलवेळी सरासरी ९ हजार ५००, तर यावर्षी ६ हजार ५०० बाजार भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितली.स्थानिक आडतदार सुभाष चांदगुडे व नंदकुमार चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यावर्षी पावसाचे कमी प्रमाण राहिल्याने चिंचेच्या उत्पादनातही निम्म्याने घट झाली आहे. यावर्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू आदी राज्यांत चिंचेचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे चिंचेचा बाजारभाव २५ ते ३० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती सुभाष चांदगुडे यांनी दिली.