नारायणगाव : श्रीक्षेत्र नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थान ट्रस्टचे पाच गाळ्यांच्या लिलावाची रक्कम जमा न झाल्याने झालेल्या वादात अध्यक्षांसह पाच विश्वस्तांना ग्रामस्थांनी राजीनामा देण्यास भाग पाडले़ सहा तास चाललेली बैठक भ्रष्टाचाराच्या आरोपासह लिलावाचे पैसे न भरता केलेला गैरकारभार व बोगस ट्रस्टची कागदपत्रे तयार केल्याच्या कारणावरून झालेल्या यात्रा कमिटीच्या वार्षिक सभेत वादविवादांनी गाजली़ देवस्थानाचे अध्यक्ष चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्याकडे असलेले एकमेव पदही गमावण्याची वेळ आली. यापूर्वी नारायणगाव ग्रामपंचायत व यात्रा कमिटीचा कारभार त्यांच्या ताब्यात होता. गेल्या दोन वर्षांत अनेक पदे त्यांना गमवावी लागली़ दरम्यान, देवस्थानाच्या पाच गाळ्यांचा लिलाव दहा लाख रुपयांना देण्यात आला़श्री मुक्ताईदेवी मंदिरात झालेल्या बैठकीला ग्रामस्थांसह देवस्थानाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते़ ही बैठक वादविवादांनी गाजणार, हे स्पष्ट झाले होते़ दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या बैठकीत हिशेबातील भ्रष्टाचाराचे आरोप, लिलावाचे पैसे न भरणे, देवस्थानाच्या ट्रस्टींची बोगस कागदपत्रे तयार करून कमिटी तयार करणे आदी विषयांवर बैठक गाजली. गेल्या वर्षी ५ गाळे २३ लाख ५० हजारांच्या बोलीवर गेले होते़ उपसरपंच संतोष पाटे यांच्या ताब्यात असलेले गाळे त्यांच्याकडे राहू नयेत, यासाठी गेल्या वर्षी उच्चांकी असा लिलाव झाला होता़ त्याच्या गेल्या वर्षी अवघ्या ३ लाख ५१ हजारांच्या बोलीवर लिलाव गेला होता़ परंतु, राजकीय संघर्षामुळे हा लिलाव २३ लाख ५० हजारांना गेला़ हा लिलाव राकेश खैरे यांनी घेतला होता़ ही रक्कम यात्रेच्या कालावधीत जमा करण्यात येते; परंतु खैरे यांनी ६ लाख रुपये जमा केले होते़ व्यवसाय न झाल्याने ही रक्कम भरण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. ग्रामस्थांनी तडजोड म्हणून २० लाख रुपये रक्कम भरावी, असा निर्णय घेतला; परंतु ती रक्कम जमा झाली नाही़ नारायणगावच्या कांबळ्यावर झालेल्या बैठकीत शेखर कोऱ्हाळे यांनी उर्वरित रक्कम हिशेबापर्यंत जमा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते़ या बैठकीला शेखर कोऱ्हाळे, संतोष वाजगे, उपसरपंच संतोष पाटे, सचिन खैरे, सुजित खैरे, मकरंद पाटे, जगन कोऱ्हाळे, दत्तोबा फुलसुंदर, दादाभाऊ खैरे, मुरलीधर फुलसुंदर, रामदास तोडकरी, जयेश कोकणे, प्रल्हाद पाटे, कैलास पानसरे, विकास तोडकरी, तात्यासाहेब बोरकर उपस्थित होते़
अध्यक्षांसह पाच विश्वस्तांकडून राजीनामा
By admin | Published: April 28, 2017 5:41 AM