भोर/नसरापूर - तालुक्यातील भाटघर धरणात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या सर्व महिला नऱ्हे येथील नातेवाईकांकडे आल्या होत्या. दरम्यान, त्यांच्याबरोबर एक मुलगीही बुडाली होती. सुदैवाने ती यातून बचावली आहे. रात्री उशिरापर्यंत चौघींचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश मिळाले.
खुशबू लंकेश रजपूत (वय १९, रा. बावधन), मनीषा लखन रजपूत (वय २०),चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघीही रा. संतोषनगर, हडपसर पुणे), मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा नऱ्हे, पुणे), अशी मृत महिलांची नावे आहेत. मनीषा रजपूत यांचा मृतदेह मिळाला नसल्याने शोधकार्य सुरूच होते.
नरे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. भोर येथील सह्याद्री सर्च ॲण्ड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आहे. दरम्यान, सह्याद्री पथकाच्या वतीने शोधमोहिम सुरू आहे. यापूर्वी भाटघर धरणात बोट उलटून १४ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. ते सर्व जण लग्नाचा कार्यक्रम उरकून धरणाच्या पलीकडे जात होते, त्यावेळी धरणाच्या पाण्यात बोट उलटली होती. त्यात १४ जणांना जीवाला मुकावे लागले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी दुर्घटना घडली आहे.