पुणे : साप म्हटल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. सापांविषयी असलेल्या गैरसमजांमुळे अनेकजण साप दिसताच क्षणी मारून टाकतात. पण याच सापांचे संरक्षण आणि त्यांच्या विषयी जनजागृती करण्यासाठी रीधिमा साळवे ही पाच वर्षांची चिमुकली पुढे सरसावली आहे.
रीधिमा ही सर्पमित्र अरविंद साळवे यांची मुलगी आहे. साळवे हे १९९९पासून सर्पमित्र म्हणून काम करत आहे. त्यांनी कात्रजच्या सर्पोद्यानात याविषयीचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. ती लहानपणापासून वडिलांचे काम बघत आहे. त्यामुळे आता तिलाही साप आवडायला लागले असून ती स्वतः अतिशय सफाईदारपणे साप हाताळू शकते. वडिलांना साप पकडण्यासाठी बोलावणे आल्यावर ती हट्टाने तिथे जाते आणि त्यांना मदत करते. अजिबात न घाबरता ती उपस्थितांना तो साप विषारी आहे बिनविषारी याची माहिती देते. तो साप शांत आहे की डिवचलेला, अशावेळी गर्दी करणाऱ्या व्यक्तींनाही ती सूचना देते. तिने आत्तापर्यंत धामण, मांजऱ्या साप, अंडीखाऊ सापाला जीवदान दिले आहे.
याविषयी अरविंद सांगतात की, ' तिला लहानपणापासून प्राणी या विषयातच रस आहे. पण अजून ती खूप लहान असल्याने मी तिला थेट विषारी साप हाताळण्यास देत नाही. मात्र बिनविषारी साप ती लीलया हाताळते. अर्थात सुरुवातीला काळजीमुळे घरच्यांनीही या साहसाला विरोध केला होता. आता तिची आवड असल्यामुळे विरोध मावळला आहे. तिने भविष्यात याच क्षेत्रात करिअर केल्यास आमची हरकत नाही. फक्त हा निर्णय तिने स्वतः घ्यावा'. रीधिमाला अजूनही ती काही वेगळं करते असं वाटत नाही. पण याविषयी तिला विचारलं की म्हणते, 'साप विषारी नसेल तर तो काहीही करत नाही. फक्त आपण त्यांना मारायला नको. आपण सगळे साप मारण्यापेक्षा त्यांच्या घरी, जंगलात सोडू'.