पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पँनेल तयार केले आहे. पुण्यातच नाट्य परिषदेच्या दोन स्वतंत्र शाखा असल्याने परिषदेच्या कोथरूड शाखेच्या अध्यक्षांनी मात्र पुणे जिल्हयाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्याला नाट्य परिषद पुणे शाखेकडून प्रतिसाद मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत गुरूवारी संपली. राज्यातील १९ जिल्ह्यांतून जवळपास १९३ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई (३८), मुंबई उपनगर (१७), ठाणे (५), लातूर (१), उस्मानाबाद (२), रत्नागिरी (५), कोल्हापूर (५), सांगली (१०), सोलापूर (१३), पुणे (२३), नाशिक (९), अहमदनगर (१३), जळगाव (५), नागपूर (१९), नांदेड (६), अकोला (५), वाशीम (९), बेळगाव (४) आणि बीड (३) या ठिकाणाहून उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये नाट्य परिषदेच्या विद्यमान शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांचाही समावेश आहे. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनीही अर्ज भरले आहेत. या दोघांसह योगेश सोमण, भाग्यश्री देसाई, विजय पटवर्धन, विनोद खेडकर, प्रमोद रणनवरे आणि प्रशांत कांबळे यांनी ‘नाटकवाले’ नावाचे पँनेल तयार केले आहे. कोथरूड शाखेकडून मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.मागच्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्यामुळे नाट्य परिषदेकडून घटनेत दुरुस्ती करण्यात आली आहे. पूर्वी विभागवार निवडणूका घेतल्या जायच्या, त्यात पश्चिम महाराष्ट्राअंतर्गत सांगली, सातारा, क-हाड, इचलकरंजी आणि पुण्याचा समावेश होता. मात्र आता नवीन घटनेनुसार 300 शाखेचे सभासद असतील त्यातला एक प्रतिनिधी परिषदेच्या नियामक मंडळावर घेतला जाणार आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्हयासाठी सात जागा आहेत. त्यात पुणे, बारामती, तळेगाव, पिंपरी चिंचवड, कोथरूड आणि दौंड या सात शाखांचा समावेश आहे. राज्यात एकूण २३,४५० मतदार आहेत. उमेदवारांची अंतिम यादी २२ जानेवारीला जाहीर होईल.मतदार केंद्रावरच जाऊन मतदान करावे लागणार-नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार आता मतदारांना बॅलेट पत्रिकेद्वारे मतदान न करता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. जिल्हयातील शाखांच्या सदस्यांसाठी मतदान केंद्राचे ठिकाण संबंधित शाखेत तसेच नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर दि. 31 जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहे. दि. 4 मार्च रोजी मतदानप्रक्रिया राबविली जाणार असून, दि. 7 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरूनाथ दळवी यांनी दिली.परिषदेचे काम काय?निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनी ‘नाटकवाले’ या पँनेलच्या माध्यमातून परिषदेचे नक्की काम काय आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील नाट्य संकुल चालवणे एवढेच परिषदेचे कार्य आहे का? मुंबई सोडून महाराष्ट्रभर पसरलेल्या परिषदेच्या शाखा आणि त्यातील आजीव सदस्यांसाठी परिषद काय करते याचा विचार करण्याची गरज आहे. या निवडणुकी नंतर निवडून आलेल्या सदस्यांनी नाट्य परिषदेच्या कार्याचा मूळ ढाचाच बदलावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंचवार्षिक निवडणूक :नाट्य परिषदेसाठी मोर्चेबांधणीस सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:14 AM