पुणे : विवाहितेकडे शारीरिक संबंधाची मागणी करून ती पूर्ण न केल्यास किंवा भेट अथवा फोन न केल्यास पतीला ठार मारण्याची धमकी देत मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 26 वर्षीय तरुणाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी हा निकाल दिला. प्रमोद निवृत्ती औसरमल (वय 26, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
सोनाली तुषार क्षीरसागर (रा. येरवडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी, 40 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2011 ते 2012 दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या मुलीचे येथील तुषार नावाच्या मुलाशी लग्न झाले होते. त्यांच्या संसार सुखात सुरू असताना प्रमोद हा सोनाली हिस दिलेल्या फोनवर फोन करत जा तसेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करू लागला. मागणी मान्य न केल्यास पतीला काहीही सांगून तुझी बदनामी करेल तसेच भेटली किंवा फोन केला नाही तर पतीला ठार मारून टाकेल अशी भीती दाखवून मानसिक त्रास दिला. आरोपीकडून होणार्या त्रासाला कंटाळून सोनाली हिने 29 एप्रिल 2012 रोजी राहत्या घऱी स्वत:ला पेटवून घेतल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात, आरोपीला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकार वकील शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. याप्रकरणात त्यांनी दहा साक्षीदार तपासले. यामध्ये, फिर्यादीची साक्ष व पीडितेने लिहिलेली चिठ्ठी महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.