पुणे : पुणे रेल्वे स्टेशन येथून भाडे स्विकारुन प्रवाशांना निर्जनस्थळी घेऊन जाऊन त्यांना शिवीगाळ, मारहाण करत त्यांच्याकडून पैसे उकाळणाऱ्या रिक्षाचालकांना बंडगार्डन अंतर्गत पुणे स्टेशन पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लुबाडलेली रोखरक्कम वसूल करण्यात आली आहे. रिक्षाचालक प्रदिप सिद्धेश्वर क्षीरसागर (वय ४०, रा. खराडी), सुजीत बाबासाहेब लाटे ( वय २८, रा. खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा सहकारी एमएच १२ एनडब्ल्यू २५१८ चा रिक्षाचालक दत्ता मोहिते (रा.भेकराईनगर) हा फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास उत्तरप्रदेश वरुन रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशनवर आलेले इसम सोफियान जमालुद्दिन अहमद, असरार सोहराब अंसारी, कौशर कादीर अंसारी, इजहार रहमुद्दीन अंसारी व गुलाम महमंद सितराज अंसारी हे कुरकुंभला जाण्यासाठी निघाले. स्टेशनवर दोन रिक्षाचालक व एका अनोळखी व्यक्तीने रिक्षा भाड्याने देतो असे सांगून पुणे स्टेशन चौकात रिक्षात बसवले. प्रवाशांकडून प्रत्येक रिक्षाभाडे म्हणून रु. ४५० ठरवण्यात आले होते.
रिक्षातून काही अंतर गेल्यावर एका निर्जनस्थळी रिक्षा बाजूला उभी करुन रिक्षाचालक व रिक्षातील अनोळखी व्यक्तीने प्रवाशांना शिवीगाळ तसेच काठीने मारहाण करत रु.६,६००/- लुबाडून घेतले व 'अभि कुछ ज्यादा बोला तो छोडेंगे नही' अशी धमकी दिली आणी प्रवाशांना सोडून रिक्षावाले निघून गेले. घडलेला सर्व प्रकार पाचही प्रवाशांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात येऊन सांगितला. पोलीसांनी गुन्ह्याची नोंद करत तक्रारदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रिक्षाचालकांचा शोध सुरु केला. यावेळी पुणे स्टेशन पोलीस चौकीचे बीट मार्शल अमंलदार शरद ढाकणे व पो. अमंलदार ज्ञानेश्वर गायकवाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालकांना कँम्प परिसरात ताब्यात घेण्यात आले. यावेळी एका रिक्षाचालकाने रिक्षा सोडून तेथून पळ काढला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक दिपक बर्गे करत आहेत.