पुणे : मागील साडेचार वर्षांत केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांच्या निवासस्थानी पक्षाचा ध्वज लावण्यास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. पक्षाच्या केंद्रीय शाखेनेच पक्ष कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम दिला असून, संबंधित कुटुंबाला पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करावे अशी सूचना केली आहे.पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवासस्थानी मेरा परिवार भाजपा परिवार अशी घोषणा लिहून पक्षाचा ध्वज लावण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे बहुसंख्य लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या घरांवर तसा ध्वज लावला आहे. आता त्याची पुढची पायरी म्हणून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरावर असा ध्वज लावण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाने सरकारी कार्यालयांमधून लाभार्थ्यांची यादी मिळवली असून, त्या यादीचे प्रभाग निहाय वर्गीकरण करण्यात येत आहे. शहरात सुमारे १ लाख कुटुंबांची नावे पक्षाला मिळाली असल्याचे समजते.पक्षाच्या बूथस्तरावरील कार्यकर्त्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे. वन बूथ टेन यूथ अशा नावाने भाजपाने मोहीम राबवली होती. त्याप्रमाणे संघटनेने रचना केली आहे. त्याशिवाय मतदार यादीत १ हजार मतदारांच्या मागे २५ कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी तयार करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांनी लाभार्थी कुटुंब शोधून त्यांच्या सातत्याने संपर्कात राहायचे आहे. पक्षाचा ध्वज त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या निवासस्थानी लावायचा आहे. आम्ही भाजपाचे मतदार असे त्यांना सांगण्यास सुचवण्यात आले आहे. शहराच्या काही भागात काम सुरू करण्यात आले आहे. याच कार्यकर्त्यांवर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली. मतदानाच्या दिवशी त्यांनी ही जबाबदारी पार पाडायची आहे. कुटुंबातील सर्व मतदारांचे दुपारी १२ वाजण्याच्या आत मतदान करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांना आधीच मतदान केंद्राची सर्व माहिती कार्यकर्त्यांनी द्यायची आहे.पक्षाच्या केंद्रीय शाखेने असे अनेक कार्यक्रम पक्षाच्या गाव, शहर व जिल्हा शाखांना दिले आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय रविवारी (दि. ३) निघणारी विजय संकल्प रॅली हा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे. निवडणूक कधीही जाहीर होवो, उमेदवार कोणीही असो, पण पक्ष संघटनेने या कामात मुळीच हयगय करू नये अशी आदेशवजा सूचना सर्व प्रमुखांना देण्यात आली असून, झालेल्या सर्व कार्यक्रमांचा छायाचित्रांसहित लेखी अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.
भाजपाकडून अजब फंडा लाभार्थ्यांच्या घरावर झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 12:33 AM