पुणे : “प्रत्येक माणूस आयुष्यात एका संधीच्या शोधात असतो. संकटाला संधी मानत अनेक तरुणांनी कोरोना काळात समर्पण वृत्तीने देशभरातील सेवाकार्यात समिधा अर्पण केल्या. यातून नवीन प्रेरणेची ज्योत तेवायला हवी, त्याद्वारे पुढील कार्याला चालना मिळेल,” असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
कोरोनाशी लढणाऱ्या जिगरबाज माणसांची सत्य घटनांवर आधारित कहाणी ‘समिधा’ या लघुपटाचे लोकार्पण डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक संचालक, पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समिधा’ हा माहितीपट एकाचवेळी आभासी माध्यमातून प्रीमिअरद्वारे आज जगभरातील दर्शकांना पाहता आला. यू-ट्यूब चॅनलवर तो दर्शकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन आहे.
डॉ. चौधरी म्हणाले की, विविध उद्योग व्यवसायातही कोरोनामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत. पी.पी.इ किट, ऑक्सिजन प्लांट यांची निर्मिती ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत, आत्मनिर्भरता हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा असून समाजाची गरज भागविण्यासाठी अनेक उद्योग उभे राहिले आहेत. समिधा पाहतांना डोळ्यातून अश्रू ओघळले, अफलातून कलाकृती निर्माण झाली आहे. समाजाचे भले करण्याची वृत्ती आणि कार्यकर्त्यांची मानसिकता जोपासत या माहितीपटाने राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे.
“समाजाच्या संघटित प्रयत्नांचे हे जागृत रूप आहे,” असे मत डॉ. कुकडे यांनी व्यक्त केले. हा माहितीपट ३२ मिनिटांचा असून त्यात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण, आस्ताद काळे, विक्रम गायकवाड, सिद्धी पोतदार यांच्यासह विविध कलाकार आणि कार्यकर्त्यानी काम केले आहे. रा.स्व.संघाचे शहर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, जनकल्याण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश बागदरे, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांताचे कार्याध्यक्ष श्यामराव जोशी, निर्माते दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यावेळी उपस्थित होते.
अवघ्या ४ दिवसांत चित्रीकरण आणि २० दिवसांत हा लघुपट तयार करण्यात आला. याप्रसंगी नूपुरा निफाडकर (पार्श्वसंगीत), सुश्रूत मंकणी (सह दिग्दर्शक), मयूरेश बवरे (संकलक), निखिल लांजेकर (ध्वनी आरेखन ) यांचे सत्कार करण्यात आले. माहितीपटाचे लेखक अमोघ वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. जनकल्याण समितीचे कार्यवाह अश्विनी कुमार उपाध्ये यांनी आभार मानले.