आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील फुलवडे गावातील हिलेवाडी, मोहरेवाडी, नंदकरवाडी, भगतवाडी या वाड्या-वस्त्यांवरील फ्युजबॉक्सची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. उघड्या फ्युजबॉक्समुळे फुलवडे गावासह वाड्या-वस्त्यांवरील फ्युजबॉक्स धोकादायक झाले आहेत. हे धोकादाय फ्युजबॉक्स बदलण्याबाबत महावितरणकडे वारंवार मागणी केली असून, ग्रामपंचायतकडूनही पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आदिवासी भाग असल्याने ग्रामपंचायतीच्या पत्रव्यवहारालाही येथे केराची टोपली दाखवली जात आहे. या गावच्या हिलेवाडी येथील ट्रान्सफार्मरमधून तर अक्षरश: जाळ निघत आहे. येथे जवळच घरे असून या घरांना यापासून धोका निर्माण झाला आहे. या भागात पावसाळ्यात प्रत्येक घरामधून जनावरांचा वाळलेला चारा साठवून ठेवला जातो. अशा वेळी हा जाळ ओकणारा ट्रान्सफार्मर येथील रहिवाशांची डोकेदुखी झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वायरमनला फोन केला असता तो नागरिकांना उलटसुलट उत्तरे देतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर वायरमन कधीही गावात येत नाही. वरिष्ठांकडे तक्रार केली असता नागरिकांना अरेरावीची भाषा केली जाते. याबाबत शाखा अभियंता घोडगाव यांना फुलवड ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन दिले आहे. महावितण या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत आहे, असे आदिवासी बिरसा ब्रिगेड संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आदिनाथ हिले यांनी सांगितले.
फुलवडे गाव (ता. आंबेगाव) व वाड्या-वस्त्यांना महावितरणच्या समस्यांनी ग्रासले असून हिलेवाडी येथील धोकादाय ट्रान्सफार्मरमुळे आदिवासी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
(छायाचित्र-कांताराम भवारी)