पुणे : सहसा हिवाळ्यातच दिसणारे फ्लेमिंगो सध्या पावसाळ्यातही डिंभे धरणावर विहार करताना दिसत आहेत. हे फ्लेमिंंगो मागील हिवाळ्यात स्थलांतर करून आलेल्यांमधलेच आहेत. पुन्हा मूळच्या ठिकाणी जाण्याची गरज नसल्याने ते इथेच थांबले आहेत.प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले, की स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. स्थलांतरित पक्ष्यांची वीण नेहमी त्यांच्या मूळच्या ठिकाणीच होत असते; कारण त्यांना यासाठी अनुकूल असणारे वातावरण मूळच्या ठिकाणीच असते. त्यांचे स्थलांतर म्हणजे काही हजार किलोमीटरचा अत्यंत दमवणारा प्रवास असतो. त्यामुळेच प्रजननक्षम नाहीत असे पक्षी हा दमवणारा प्रवास टाळून स्थलांतर करून आलेल्या ठिकाणीच राहतात. डिंभे धरणावर सध्या दिसणारे फ्लेमिंगो त्यापैकीच आहेत. उजनी धरणावरही सध्या फ्लेमिंगोचा असा एखादा थवा असण्याची शक्यता आहे.गुजरातमधील कच्छच्या रणातून तसेच थेट इराण, ओमेन या देशांमधूनही पुण्यात फ्लेमिंगो आल्याच्या नोंदी आहेत. त्यांच्या पायात रिंग घालून अशा नोंदी केल्या जातात. न परतलेले पक्षीही त्यामुळे अभ्यासकांच्या लक्षात येतात. पक्ष्यांचे स्थलांतर हिवाळ्यात होते, कारण त्यांना स्थलांतरासाठी हे वातावरण अनुकूल असते. साधारण एक हंगाम ते स्थलांतरित ठिकाणी राहतात. त्यानंतर जे प्रजननक्षम आहेत ते लगेचच परतीचा प्रवास सुरू करतात व मूळच्या ठिकाणी जातात. येण्याच्या व जाण्याच्या प्रवासातील त्यांची मुक्कामाची ठिकाणेही ठरलेली असतात. अशी ठिकाणे आता तथाकथित पर्यटकांची, हौशी पक्षिनिरीक्षकांची गर्दी किंवा बांधकामांपासून जपायला हवीत, असे डॉ. पांडे म्हणाले. (प्रतिनिधी)
पावसाळ्यातही फ्लेमिंगोंचा विहार
By admin | Published: July 29, 2015 12:09 AM