किरण शिंदे
पुणे: ड्रग्स माफिया ललित तस्कर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्याचे कारनामे उघडकीस येत आहेत. ललित पाटील याला मदत करणाऱ्यांच्या मुसक्या आवळन्यास पोलिसांनी आता सुरवात केली आहे. पुण्यातील संस्थाचालक विनय अरहाना याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याचे देखील अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. ललित पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना विनय अरहानाने ललित अन् त्याच्या 'त्या' मैत्रिणीला भेटण्यासाठी फ्लॅट उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विनय अरहानाला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते. तर दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात ललित पाटील या गुन्ह्याचा सुत्रधार असल्याचे समोर आले होते. मात्र त्याला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पसार झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम 224, 225 नुसार गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणाचा तपास सुरू असताना ललित पाटील याला पळून जाण्यासाठी विनय अरहानाचा वाहन चालक दत्ता डोकेने पळून जाण्यात मदत केल्याचे समोर आले होते. तर डोकेने त्याला पैसे देखील पुरवले होते. डोके याने हे सर्व अरहाना याच्या सांगण्यावरून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अरहाना याला या गुन्ह्यात ताब्यात घेतले.
ललित अन् विनयची अशी झाली ओळख
ईडीने दाखल केलेल्या एका गुन्ह्यात विनय अरहाना हा न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर न्यायालयीन कोठडीतून तो उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला होता. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचार घेत असताना त्याची ओळख आधीच त्याठिकाणी असलेल्या ललित पाटील सोबत झाली. आणि त्यानंतर विनयने ललित पाटील याला वेळोवेळी मदत केल्याचे आता समोर येत आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला फ्लॅट विनय अरहाना याने ललित पाटील आणि त्याच्या त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती आता समोर आली आहे. ललित पाटीलने 30 ऑक्टोबर रोजी मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी काही 'क्षण' घालवले. त्यामुळे रुग्णालयात असतानाही ललित त्या फ्लॅटवर कसा गेला? यासाठी त्याला कोणी कोणी मदत केली? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.