पुणे : पुणेकर आणि त्यांच्या इरसालपणाची चर्चा सर्वत्र असते. पुणेरी टोमणे तर जगभर प्रसिद्ध आहेतच. पण गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे प्रसिद्धीस येत आहे. एकीकडे शहराला बेकायदेशीर होर्डिंगने घेरले असताना दुसरीकडे कोणाचेही थेट नाव न घेता करण्यात येणारी पोस्टरबाजीही चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शिवडे, आय एम सॉरी नंतर आता सविताभाभी हे नाव घेऊन पोस्टर लावण्यात आली आहेत. पुण्यातील म्हात्रे पुलासह अनेक भागात हे पोस्टर बघायला मिळत आहेत.
पुण्यातील सोशल मीडियावर गुरुवारी सकाळपासून ''सविताभाभी, तू इथंच थांब....'' असं पोस्टर व्हायरल झालं आहे. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या या पोस्टरवर बाकी काहीही लिहीले नसल्याने कोणी आणि का लावली असं प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी पिंपरी येथे 'स्मार्ट बायका कुठे जातात' असा फ्लेक्सव्हायरल झाला होता. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने टीका झाल्यावर माफीही मागितली होती. हा देखील अशाच प्रसिद्धीचा प्रकार असू शकतो असे मत काहीजण व्यक्त करत आहेत. मात्र सध्या या फ्लेक्सवरून सोशल मीडियात मात्र भन्नाट चर्चांना उधाण आले आहे.