- लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : आपल्या अद्भूत सौंदर्याने भल्याभल्यांना भुरळ घालणाऱ्या देखण्या, राजबिंड्या फ्लेमिंगोंचे पुणे जिल्ह्यात आगमन झाले आहे. पक्षिप्रेमी आणि पर्यटनप्रेमींच्या लाडक्या फ्लेमिंगोंची सध्या पिंपळगाव जोगा धरण परिसरात मांदियाळी जमल्याचे दिसून येत आहे. हे सौंदर्यदर्शन कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटक व पक्षी प्रेमी गर्दी करत आहेत. धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी फ्लेमिंगोसह विविध प्रकारचे पक्षी गर्दी करत असतात. माणिकडोह, वडज, येडगाव, चिल्हेवाडी व पिंपळगाव जोगा अशी ५ धरणे या तालुक्यात आहेत. याच धरणांच्या पाणलोट परिसरात अनेक पक्षी मोठ्या संख्येने येथे दिसतात. माळशेज घाटाजवळ असणाऱ्या व किल्ले हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या वाटेवरील पिंपळगाव जोगा या धरणामध्ये तब्बल ३० वर्षांपासून हे फ्लेमिंगो नित्यनियमाने येत आहेत. दरवर्षी आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये या राजबिंड्या पक्ष्यांचे आगमन होत असते. उंच पाय, लांब चोच, लाल रंगाचा हा पक्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे. त्याला रोहीत पक्षीही म्हणतात. उडताना लाल पंखांमुळे अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे भासतो म्हणून त्याला अग्निपंख असेही म्हटले जाते.डोळ्यांचे पारणे फेडणारा एक सुंदर क्षणरोहितला माणसाची वर्दळ, गर्दी, त्रास सहन होत नाही. आपण जर त्याच्या जास्त जवळ जाण्याचा विचार केला तर तो हौक असा नाकातून आवाज काढून खाणं थांबवतो.हळूहळू सर्व पक्षी पाण्यातून चालत चालत वेग वाढवतात, उचल घेतात व पॅडलिंग करीत वेग वाढवून उडू लागतात. त्या वेळी त्यांचे ते उडणे पाहणे म्हणजे एक अद्भूत नजारा असतो, नव्हे तर डोळ्यांची पारणे फेडणारा तो एक सुंदर आणि स्वत:ला भाग्यवान समजावे असा तो क्षण असतो असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही..!संपूर्ण जगामध्ये या पक्ष्याच्या एकूण ६ जाती आढळतात. ग्रेटर फ्लेमिंगो हा भारतातील स्थानिक पक्षी आहे. भातखाचरं, लहान-मोठं तळं, गोड्या पाण्याचा तलाव, जलाशय, खाड्या, मोठ्या धरणाचा पाणपसारा, मिठागरे, दलदली हे ह्या पक्ष्याचे अधिवासाचे ठिकाण आहे. या पक्ष्यांचा फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ विणीचा हंगाम असतो.- सुभाष कुचिक, पर्यावरण अभ्यासक, खोडद