पुणे: अनेक नाट्यमय घडामाेडींनंतर देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अवघ्या 79 तासाचे ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीकडून मुख्यंमत्री पदाचे उमेदवार म्हणून घाेषित करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे भाग पडणे भाजप कार्यकर्त्यांना नाराज करुन गेले. फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतल्यानंतर पुण्यातील भाजप कार्यलयात त्यांच्या अभिनंदाचे फ्लेक्स लावण्यात आले हाेते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही अद्याप हे फ्लेक्स काढण्यात आलेले नाहीत.
शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस पक्षाने एकत्र येत सरकार स्थापन करायचे असल्यास किमान समान कार्यक्रम असावा असे काॅंग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांना वाटत हाेते. त्यासाठी गेले अनेक दिवस बैठकांचे सत्र सुरु हाेते. शुक्रवारी या कार्यक्रमावर सर्वांचे शिक्कामाेर्तब झालेले असताना शनिवारी सकाळी आठ वाजता अजित पवार यांच्या पाठिंब्याने देवेंंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या हाेत्या. फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर भाजपकडून जल्लाेष करण्यात आला हाेता. मुंबई भाजप कार्यालयात लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला हाेता. पुण्यात देखील जंगली महाराज रस्त्यावरील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाला सजविण्यात आले हाेते. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आले हाेते. ''महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस'' असे या फ्लेक्सवर लिहीण्यात आले हाेते.
काल फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप भाजप कार्यालयाबाहेरचे फ्लेक्स काढण्यात आलेले नाहीत. अजूनही कार्यालयाच्या रस्तावर आणि कार्यालयाच्या परिसरात हे फ्लेक्स लागलेले दिसून येतात. त्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आज विधानभवनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना गाेपनियतेची शपथ देण्यात आली. उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्क मैदानावर शपथ घेणार आहेत.