पिंपरी : पिंपरी वाघेरे येथे जलतरण तलावावर छत उभारण्यात येणार आहे. मात्र, यासाठी तब्बल १ कोटी ८० लाखांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे हे काम तीन टक्के जास्त दराने करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे. एकीकडे काटकसरीचे धोरण अवलंबणार असल्याचे बोलले जात असताना, केवळ छत उभारणीसाठी कोटीची उड्डाणे घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पिंपरी वाघेरे प्रभाग क्रमांक ४५ येथे जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. या तलावावर ‘प्री स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचे छत उभारण्याचे नियोजित आहे. या कामासाठी महापालिकेने १ कोटी ७४ लाख ६९ हजार ९८८ रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, यासाठी निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये तीन निविदा प्राप्त झाल्या. एका ठेकेदाराने तीन टक्के जास्त दराची निविदा सादर केली. आयुक्तांनी ही निविदा स्वीकारण्यास अनुकूलता दर्शविली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे. तीन टक्के जास्त दर असल्याने हे काम १ कोटी ७४ लाख ६९ हजारांवरून १ कोटी ७९ लाख ९४ हजारांवर पोहोचले आहे. या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे. जमा व खर्चाचे नियोजन करताना दमछाक होत आहे. एकीकडे खर्चात काटकसर करण्याचे नियोजन केले जात आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात खर्च सुरू आहे. (प्रतिनिधी)या छतामध्ये आहे काय ? एका जलतरण तलावाचे केवळ छत उभारणीसाठी तब्बल १ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याने या छताबाबतही भलतीच ‘उत्सुकता’ आहे. या छतामध्ये नक्की कोणाचे अर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यावर महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चर्चा होणार की, प्रस्ताव डोळे झाकून मान्य होणार, याची उत्सुकता आहे.
छतासाठी ‘कोटीं’ची उड्डाणे
By admin | Published: January 12, 2016 4:00 AM