पुणे : लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२१ मध्ये ही इमारत पुर्ण होणार आहे. सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या इमारतीमुळे प्रवासी क्षमता दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे सध्या भेडसावणाऱ्या विविध अडचणींमधून प्रवाशांची सुटका होणार आहे.पुणे विमानतळाच्या सध्याच्या टर्मिनल इमारतीच्या विकसनात जागेचा अडथळा आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा देता येत नाहीत. तसेच जागेअभावी विमान उड्डाणांवरही मर्यादा आहेत. विमानांचे पार्किंग, माल वाहतुकीसाठी पुरेशी जागा नाही. यापार्श्वभुमीवर सध्या इमारती लगतच्या नवीन टर्मिनल इमारत उभारली जात आहे. एका खासगी कंपनीकडून डिसेंबर २०१८ पासून काम सुरू करण्यात आले आहे. एकुण पाच लाख चौरस फुट बांधकाम क्षेत्र असून ४७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आतापर्यंत इमारतीचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. नवीन इमारत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असणार आहे. दरवर्षी सुमारे १ कोटी ९० लाख प्रवासी या इमारतीतून ये-जा करू शकतात. सध्या दरवर्षी सुमारे ८० ते ९० प्रवासी आहेत. पाच प्रवासी बोर्डिंग पुल, आठ सरकते जिने, १५ लिफ्ट ३४ चेक इन काऊंटर आधी सुविधा असणार आहेत. इमारतीला हरित मानांकन असल्याने उर्जेची बचत होईल.----------------------टर्मिनल इमारतीची वैशिष्ट्य -- प्रस्तावित खर्च ४७५ कोटी- सुमारे १.९० कोटी वार्षिक प्रवासी क्षमता- ५ लाख चौरस फुट क्षेत्र- हरित इमारतीचे मानांकन- पाच प्रवासी बोर्डिंग पुल- आठ सरकते जिने- १५ लिफ्ट- ३४ चेक इन काऊंटर