पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील सर्वच धरणं शंभर टक्के भरली आहेत. गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाल्याने पुण्यातील नद्यांना पूर आला हाेता. खडकवासला धरणातून 45 हजार क्सुसेस पेक्षा अधिक वेगाने पाणी साेडण्यात येत हाेते. त्यामुळे पुण्यातील नद्यांच्या कडेला असलेल्या अनेक झाेपडपट्यांमध्ये पाणी शिरले हाेते. त्यातच येरवडा भागातील शांतीनगर झाेपडपट्टीत शिरलेल्या पाण्यामुळे येथील नागरिकांच्या घरांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. एका पुराने अनेकांचे संसार वाहून गेले आहेत.
सर्वच धरणं भरल्याने मुठा तसेच मुळा नदीपात्रात माेठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत हाेता. त्यामुळे नदीकिनारच्या वसाहतींना सावधानतेचा इशारा देण्यात आला हाेता. गेल्या शनिवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास शांतीनगर झाेपडपट्टीत पाणी शिरले. क्षणात येथील अनेक घरे पाण्याखाली गेली. आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी या भागात हाेते. या आस्मानी संकटामुळे येथील शेकडाे लाेकांचे संसार आता उघढ्यावर आले आहेत. घरात केवळ चिखल आणि घाण उरली आहे.
रात्रीच्या सुमारास अचानक पाणी आल्याने येथील नागरिकांना कुठलेही सामान घेऊन बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरात असलेले सर्व सामान पाण्यात गेले. अनेकांचे टिव्ही, फ्रीज या पाण्यामुळे खराब झाले. तसेच घरातील सामान देखील अस्थव्यस्थ झाले. येथील नागरिकांना अद्यापही मदत मिळाली नसून केवळ एक ब्लॅंकेट महापालिकेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे येथी नागरिक आता मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.