बारामती : पुरंदर तालुक्यात गराडे गावी फाटलेल्या आभाळाचा फटका कऱ्हेच्या काठाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.यामध्ये अनेकांच्या संसाराची वाताहत झाली.त्याचप्रमाणे मुके जीव देखील यातुन सुटले नाहीत.नदीकाठी असणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मात्र, याचवेळी पुराच्या पाण्यात वाहुन आलेले शेकडो साप रस्त्यावर येवुन वाहनांखाली चिरडले जात होते.तर मानवी वस्तीत शिरलेले साप मारले जात होते. या मुक्याजीवांना वाचविण्यासाठी कोणी वाली नव्हता.याचवेळी शहरातील निसर्गप्रेमी युवकांनी,सर्पमित्रांनी पुढाकार घेत सुमारे ८३ सापांना पकडुन वनविभागात सोडत जीवदान दिले.
मुक्या प्राण्यांबदद्ल समाजातील संवेदनशीलता नेहमी अनुभवास येते.मात्र,अनेकदा ती केवळ बोलण्यामध्ये,संभाषणामध्येच असते. मुक्याप्राण्यांबदद्ल संवेदनशीलता कृतीत आणणारे दुर्मिळच असतात. शहरातील नेचर फ्रेंडस ऑर्गनायझेशन ही निसर्गप्रेमी युवकांची संघटना त्यापैकीच एक आहे. सापांसह वन्यजीव मुक्या जीवांसाठी या संस्थेतील युवक काम करतात. या युवकांनी पुरपरीस्थितीमध्ये मानवी वस्तीत घुसलेल्या पुरातील सापांना शिताफीने पकडत जीवदान दिले.तसेच,रस्त्यावरील वाहनांखाली चिरडल्या जाणाऱ्या सापांना वाचवले.त्यामुळे पुर परिस्थितीत माणसांप्रमाणेच मुक्या जीवांसाठीदेखील संरक्षण यंत्रणा राबविली गेली.परिणामी ८३ सापांना यातुन जीवदान दिले.यासाठी अन्नपाण्याची काळजी न करता १५ पेक्षा अधिक सर्पमित्रांचे पथक सुमारे १० तास कार्यरत होते. सायंकाळी उशिरापर्यंत काम करणारे पथक बारामतीकरांच्या कौतुकाच विषय ठरले आहे. नदीला पुर आल्याने पात्रातील साप नदीकाठच्या काही घरांमध्ये शिरले.यामध्ये काही साप घरात शिरले.यावेळी सर्पमित्रांना हे साप पकडण्यासाठी बोलविण्यात आल्यानंतर सापांच्या बचाव कार्याला सुरूवात झाली.
कारण एक दोन नव्हे तर अनेक घरांमध्ये हे साप शिरल्याचे निरोप सर्पमित्रांना आले.याचवेळी काही निसर्गप्रेमींना कऱ्हा नदीपात्रालगतच्या रस्त्यावर पुराच्या पाण्यातुन मोठ्या प्रमाणात साप बाहेर येत आहेत.बाहेर आलेले साप वाहनांखाली चिरडले जात असल्याची माहिती देखील सर्पमित्रांना मिळाली.त्यानंतर या सर्वांनी एकत्र येत सापांना वाचविण्यास मोहीम राबविली. ती मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली.
नाग,घोणस या सापांचे प्रमाण यामध्ये अधिक होते. तर जमिनीवर आढळणारा कवड्या हा बिनविषारी साप यावेळी सापडल्याने सर्पमित्र चक्रावुन गेले आहेत.तसेच पाणदिंड्या (हिरवा) साप मोठ्या प्रमाणात आढळला.तसेच धामण साप यामध्ये आढळला नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.शहरातील खंडोबानगर,नागवडे वस्ती,म्हाडा कॉलनी भागातील घरांमध्ये साप आढळल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.यामध्ये बबलु कांबळे,श्रीकांत पवार,अक्षदशहा,अक्षय गांधी,श्रेयस कांबळे, पारस मेहता आदी सर्पमित्रांचे योगदान महत्वपुर्ण ठरले.———————————————....नदीकाठी घरात साप शिरण्याचा धोका अधिक
ऑर्गनायझेशन चे प्रमुख बबलु कांबळे यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले ,पुरस्थितीनंतर १५ दिवस सापांचा धोका आहे.सध्या पुराच्या पाण्यातुन बाहेर आलेले साप अडगळीत लपुन राहतात.भुक लागल्यावर हे साप बाहेर येतात.विशेषत नदीकाठच्या घरांमध्ये हे साप शिरण्याचा धोका अधिक आहे.पुरस्थिती पुर्ववत झाल्यावर सबंधितांनी घरात जाताना , घरातील सामान काढताना दक्षता घ्यावी. काठीच्या सहाय्याने सामान काढावे.साप, विंचवासारखे प्राणी असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यापार्श्वभुमीवर सावधानता बाळगण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.