पुणे : रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पन्हाळीच मागील काही वर्षांत गायब झाल्या आहेत. रस्त्यांचे सुशोभीकरण, काँक्रिटीकरण करण्याच्या नादात रस्ते शास्त्रीय पद्धतीने बांधले जात नसल्यामुळेच पावसाचे पाणी साचून चौकाचौकांमध्ये पूरसदृश स्थिती होत असल्याचे नगररचना तज्ज्ञांचे मत आहे.
शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसात डेक्कनच्या गुडलक चौकात प्रथमच दुचाकी वाहन अर्धे बुडेल इतके पाणी साचले होते. पूर्वी कधीही असे होत नव्हते. मागील काही वर्षात मात्र शहरातील अनेक चौकांमध्ये थोड्याशा पावसातही पाणी साचून राहते. पूरसदृश स्थिती निर्माण होते. शुक्रवारी सायंकाळी पावसात डेक्कन व शहराच्या अन्य भागातही अशीच स्थिती होती.
याविषयी काही जुने ठेकेदार, नगररचना तज्ज्ञांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रस्त्यांच्या रचनेतच बदल केला गेल्याने हे होत आहे. पूर्वी रस्त्याच्या बरोबर मध्यभागी थोडा उंचवटा व दोन्ही बाजूंना हलकासा उतार असे. त्यामुळे कितीही पाऊस पडला तरी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून न राहता कडेला वाहून जात असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पन्हाळी (चर) केलेला असे. त्याला गटारीच्या बाजूने उतार केलेला असायचा. त्यामुळे हे पाणी बरोबर वाहून पुढे थेट गटारीत जात असे. कितीही जोराचा पाऊस आला तरी त्यामुळेच रस्त्यावर किंवा चौकात कुठेही पावसाचे पाणी साचून रहायचे नाही.
''रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच सततचे खोदकाम यामुळे या पन्हाळी बुजल्या. त्या असायला हव्यात असे एकाही ठेकेदार किंवा महापालिकेच्या अभियंत्याला वाटत नाही. त्याऐवजी सपाट रस्त्यांवर लोखंडीजाळी लावून त्यातून पावसाचे पाणी जाईल अशी रचना करण्यात आली जी अयोग्य व बीनकामाची आहे. - रा. ना. गोहाड, नगररचना तज्ज्ञ''
''रस्ता खोदून तयार करण्याचे कामच आता होत नाही. डांबरखडी मिक्स करणारा मिक्सर थेट रस्त्यावर आणून उभा करतात व त्यातून सगळा माल रस्त्यावर पडतो. लगेचच त्यावर रोलर फिरवला जातो. त्यामुळे रस्त्यावर मध्यभागी उंचवटा, दोन्ही बाजूंना उतार, पन्हाळी अशी रचनाच केली जात नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. - रस्त्याची कामे करणारे ज्येष्ठ ठेकेदार''