पुणे : पूरप्रवण व दरडप्रवण गावांमध्ये यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. तालुका व गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी मुख्यालयी राहून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी. तसेच बाधित गावातील नागरिकांचे तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या.
डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती, पूरप्रवण गावे, दरडप्रवण गावे, व झालेल्या नुकसानीबाबत तालुकास्तरीय यंत्रणेसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, आपत्तीच्या कालावधीत काम करताना यंत्रणेमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेसोबतच व गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक तसेच यंत्रणेतील सर्वांनी मुख्यालयी थांबणे गरजेचे आहे. गावातील परिस्थितीबाबत सातत्याने प्रशासनाला माहिती द्यावी. नियंत्रण कक्ष दक्षतेने कार्यान्वित करा, तसेच पाऊस कमी झाल्यावर नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरू करावेत. शासकीय मालमत्तेच्या प्राथमिक नुकसानीचे अहवाल संबंधित यंत्रणेने सादर करावेत.
डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, जिल्हयातील पूरस्थिती नियंत्रणात असली, तरी पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क राहावे लागेल. पूरप्रवण व दरडप्रवण गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच पर्यटनस्थळी तसेच धबधब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही गावपातळीवर आपत्तीच्या कालावधीत काम करताना काय काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना दिल्या.