येडगाव : कुकडी प्रकल्पातील धरण परिसरात गेल्या चोवीस तासांत पावसाने हाहाकार केल्याने प्रकल्पातील धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. येडगाव धरणातून पूरपरिस्थिती लक्षात घेता नदीपात्रात २० हजार क्युसेक्सने व कुकडी डाव्या कालव्यास १००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. वडज धरणातूनदेखील मीना नदीपात्रात ७७२४ क्युसेक्स व मीना कालव्यास ४०० क्युसेक्स पाणी सोडल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ येथील कार्यालयातून मिळाली.येडगाव धरणात सर्वाधिक पाण्याची आवक होत असल्यामुळे त्या धरणाची पूर परिस्थिती लक्षात घेता, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजीराव बोलभट यांच्या मागदर्शनाखाली येडगाव धरणातून नदीपात्रात २० हजार क्युसेक्स व कुकडी डाव्या कालव्यास १००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. वडज धरणातूनदेखील मीना नदीपात्रात ७७२४ क्युसेक्सने, तर मीना पूरक कालव्यास ४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. येडगाव धरणात अचानक आलेल्या पाण्याच्या आवकीमुळे सर्वत्र हाहाकारच उडवला असून, अचानक झालेल्या पाण्याच्या वाढीमुळे धरण परिसरातील शेतकऱ्यांचे कृषिपंप काही क्षणातच पाण्यात गेले. धरण परिसरात मच्छिमार व्यावसायिकांनी उभारलेल्या झोपड्यादेखील काही समजण्याच्या आतच पाण्याखाली गेल्या. पाणीसाठ्यातील वाढीने कुकडी प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक केली. येडगाव धरणातील पाणीसाठ्यात होणाऱ्या मोठ्या वाढीमुळे कुकडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी दीपक सराफ व येडगाव धरणाचे शाखा अभियंता आर. जी. हांडे येथील पाण्यासाठ्यावर नजर ठेवून दिवसभर येडगाव येथील कार्यालयात होते.कुकडी प्रकल्पातील धरणात आज रोजी असलेला उपयुक्त पाणीसाठा धरणनिहाय दशलक्ष घनफूटमध्ये, तर कंसात टक्केवारी :येडगाव २६१३ (३%), माणिकडोह ३१९७ (३१ %), वडज १०३६ ( ८८%), पिंंपळगाव जोगा १०९० ( २८ %), डिंंभा ६३३० ( ५१ %) असा एकूण धरण मिळून कुकडी प्रकल्पात आज रोजी १४२६६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, तो टककेवारीमध्ये ४६ % इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात २०८०८ दशलक्ष घनफूट टक्केवारीमध्ये ६९ टक्केइतका होता, तर मंगळवारी दुपारी ७.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, एका रात्रीत या पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे. (वार्ताहर)
नद्यांना पूर
By admin | Published: July 31, 2014 2:55 AM