पुणेः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या पावसावर चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातल्या श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी राज्यात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, मुसळधार पावसानं कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घर, लहान मोठ्या व्यवसायांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा दरवेळी संकटं आल्यावर कष्ट करायला तयार असते. यावेळी मात्र शासकीय यंत्रणा जवळपास नाही, अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर आणि सांगली हा महत्वाचा भाग आहे. इथून सर्वाधिक दुधाचा पुरवठा होता. इथून 30 ते 40 टक्के दुधाचा पुरवठा होतो. या भागात चहुबाजूंनी नुकसान झाले आहे. अशी स्थिती माझ्या पाहण्यात आलेली नाही. यावेळी पुराची व्याप्ती मोठी आहे. अभूतपूर्व नुकसानाला राज्य तोंड देत आहे. सरकारने पाणी आटल्यावर ताबडतोब नुकसान भरपाई द्यायला हवी, पंचनामे करावेत, अशी मागणीही पवारांनी केली आहे. आज प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता पूरग्रस्तांना सेवाभावी संस्था, सार्वजनिक संस्थांनी एकत्र येऊन मदत करावी. पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. लोकांना वाचवणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण नंतर करूया, आधी लोकांना मदतीची गरज आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की, या संकटातून बाहेर काढताना जमेल ते ते सगळे करूया. जमेल त्यांनी संस्थेच्या किंवा व्यक्तिगत माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करावी, असंही पवार म्हणाले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊसपिकांच्या शेतांची माहिती घ्यावी. माझ्या पक्षाची यात्रा दुष्काळी भागात आहे. पूरग्रस्तभागात नाही. मात्र आम्ही ती आज आम्ही ती थांबवत आहोत. कार्यकर्त्यांची ऊर्जा मदतीसाठी लागणे गरजेचे आहे. एनडीआरएफसारखी यंत्रणा राज्य सरकारने करणे गरजेचे आहे. 2005पेक्षा यावेळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चित्र अधिक गंभीर आहे. व्यक्तीगत अनुभव म्हणून महाराष्ट्रात प्रशासक म्हणून काम केले. ज्या ज्या वेळी संकटे आली तेव्हा महाराष्ट्राची यंत्रणा तुटून पडली. यावेळी असे का झाले नाही हे माहिती नाही.
राज्यात पूरस्थिती; शासकीय यंत्रणा जवळपासही नाही- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 5:39 PM