बारामती : विधानसभा निवडणुकीत दीड लाखांहून अधिक मताधिक्य देत निवडून आलेल्या अजित पवारांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ तशी दोनदा पडली. अवघ्या दीड महिन्यात दोनदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम फक्त अजितदादांच्याच नशिबाने जुळवून आणला. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर बारामतीकरांनी ज्या दिमाखदार आणि जल्लोषात अजितदादांचे स्वागत केले ते पाहून एकच वाक्य समोर येते म्हणजे .. नादखुळा ..चर्चा तर होणारच ना! राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचे बारामतीत जोरदार स्वागत करण्यात आले .
बारामती शहरातून अजित पवारांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र जय यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली . बारामती शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी" करण्यात आली . ही पुष्पवृष्टी बारामतीकरांच्या कौतुकाचा विषय ठरली .पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल येथील अखिल तांदळवाडी वेळेस तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली . उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने त्याचा जोरदार आनंद साजरा करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून मिरवणूक व सत्कार समारंभावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन केले .त्याकरता आवश्यक असणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या परवानगी घेतल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली .