जेजुरी : उद्या सोमवती अमावस्या असल्याने जेजुरी गडकोटातील मुख्य मंदिर आणि गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
उद्या सोमवती अमावस्या यात्रा असल्याने लाखो भाविकांची गर्दी जेजुरीत झाली असती. मात्र, कोरोना महामारीमुळे या यात्रा होणार नसल्याने भाविकांना जेजुरीत प्रवेश नाकारण्यात आला आहे. सोमवती अमावस्या यात्रा असली की जेजुरीत रविवार आणि सोमवारी मोठी गर्दी असते. रविवारीही भाविकांची गर्दी होती. मात्र, शहरात बाहेरून आलेल्या भाविकांना प्रवेश नाकारल्याने भाविकांचा हिरमोड झाला. मात्र, प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा बंदी जाहीर केली असल्याने भाविक जेजुरीत आले नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी यात्रेचे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. पोलीस, प्रशासन, आणि ग्रामस्थांच्या बैठकीत सोमवती यात्रा न भरवण्याचा तसेच मंगळवारपासून सूरु होणारा चंपाषष्ठी उत्सव ही केवळ धार्मिक कार्यक्रमात केला जाणार आहे. मंदिर, गडकोटात गर्दी होऊ नये म्हणून देव संस्थानकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोमवती यात्रेच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी महाद्वार पथावरील बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.
फोटो: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट