पुणे : गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाला आणि उजनी धरणातील पातळी वाढली. त्यामुळे यंदा पाणी कमी न झाल्याने दर वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रोहित (फ्लोमिंगो) पक्षी येत असतात. ते थेट मार्च महिन्यात पाहायला मिळाले. तेदेखील खूप कमी आले. सध्या उजनी धरणाचे पाणी कमी झाल्याने शेकडोच्या संख्येने रोहित पक्षी मनसोक्त विहार करत आहेत. लॉकडाऊन असल्याने नागरिकांना ते पाहता येत नाहीत. परिणामी, येथील व्यावसायिकांचा व्यवहारही ठप्प झाला आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर अजूनही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. उजनी जलाशयात दर वर्षी हजारो पर्यटक फ्लोमिंगो पाहायला येतात. त्यामुळे स्थानिकांना त्यातून पैसे मिळतात. चार महिने या फ्लोमिंगो पक्ष्यांमुळे भिगवण परिसरातील बोटिंग, हॉटेल व इतर व्यावसाय चांगला होत असतो.
——————————
बोटिंग बंद, स्थानिक हैराण
उजनी जलाशयाच्या परिसरात सुमारे ३५ ते ४० बोट आहेत. हॉटेल व्यावसायिक आहेत. यांचा व्यवसाय यंदा बुडाला आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये लॉकडाऊन शिथिल होते. पण, तेव्हा फ्लोमिंगो नसल्याने पर्यटकांनी उजनीकडे पाठ फिरवली होती. तेव्हा काहीच व्यवसाय झाला नाही. त्यानंतर मार्च महिनाअखेर फ्लोमिंगो मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झाली. पण आता पर्यटक नाहीत.
—————————-
गतवर्षी चांगला पाऊस झाला. परिणामी, उजनी जलाशयात भरपूर पाणी साठले. ते पाणी जोपर्यंत ओसरत नाही आणि पाणथळ जागा तयार होत नाहीत, तोपर्यंत फ्लोमिंगो येत नाहीत. यंदा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काहीच फ्लोमिंगो दिसले. त्यानंतर मार्च अखेर हळूहळू येऊ लागले. दरवर्षीच्या प्रमाणात हे फ्लोमिंगो खूपच कमी आहेत. लॉकडाऊनमुळे तर त्यांना पाहायला पर्यटक येत नाहीत.
- अक्षय गवारी, पक्षीमित्र, उजनी जलाशय
————————
अग्निपंख पक्ष्याविषयी...
रोहित म्हणजेच फ्लोमिंगोला अग्निपंखही म्हटले जाते. कारण त्यांच्या पंखांमध्ये अग्निसारखा रंग आहे. तो उडताना अतिशय सुंदर दिसतो. पाच फूट उंच असलेला हा पक्षी उडताना पंख पसरल्याने तो सहा फुटांच्या लांबीचा होतो. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात त्याची वीण होते. फ्लोमिंगो मादी दोन अंडी घालते. ती अंडी सुमारे ३० ते ३२ दिवसांनी उबतात.
फ्लोमिंगोंचे अन्न हे पाणथळ जागांमधील सूक्ष्म जीव-जीवाणू, अळ्या, पाणकिडे, पाणवनस्पतीच्या बिया, एकपेशीय शैवाल असते.
———————-