लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतातील महिलांवर होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांमध्ये क्रमांक एकवर बलात्कार नव्हे तर कौटुंबिक हिंसाचार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानुसार लॉकडाऊनच्या काळात नोंद झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे. कौटुंबिक आणि शारीरिक हिंसाचाराविरुद्ध महिलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ (फ्लो), पुणे चॅप्टरने ‘स्वमान से’ अर्थात ‘सन्मानाने’ या लघुपटाची निर्मिती केली आहे.
या लघुपटाचे अनावरण नुकतेच फ्लो पुणे चॅप्टरच्या ऑनलाईन वार्षिक स्नेहमेळाव्यात चॅप्टरच्या अध्यक्ष डॉ. अनिता सणस व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी चॅप्टरच्या उपाध्यक्ष उषा पूनावाला, माजी अध्यक्षा वर्षा तलेरा, सबिना संघवी, वर्षा चोरडिया, संगीता लालवाणी, रितू छाब्रिया आदी उपस्थित होते.
या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन फ्लो पुणे चॅप्टरच्या सदस्य दीप्ती घाटगे यांचे असून, चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. सणस व नीरु गोयल या निर्मात्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात समाजात विशेषत: उच्च मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले असल्याचे यावेळी सणस यांनी सांगितले.