पुणे : राज्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत आहे. ही परिस्थिती २० ते २१ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. अद्याप कडाक्याची थंडी पडलेली नाही. सर्वात कमी किमान तापमान १३ अंशावर नोंदवले गेले. पण येणाऱ्या एक-दोन आठवड्यात या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये किमान तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ ते १९ नोव्हेंबर रोजी पुण्यासह राज्यात थंडीत वाढ होईल. सोमवारपासून (दि.१८) राज्यामध्ये ढगाळ वातावरण कमी होईल. त्यामुळे स्वच्छ आकाशाखाली पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दीर्घतरंगीय किरणोत्सर्ग अधिक प्रमाणात होतील. परिणामी स्वाभाविकच रात्रीच्या तापमानात तसेच पहाटेच्या सुमारास नोंदवले जाणाऱ्या किमान तापमानात टप्प्याटप्प्याने घट होईल. परिणामी थंडी वाजण्यास सुरवात होईल. पुण्यात रविवारी (दि.१७) किमान तापमान १८.३ अंशावर होते. शनिवारी रात्री गारवा कमी होता. पण रविवारी सकाळी अन् दुपारी देखील आल्हाददायक वातावरण होते. खूप थंड आणि खूप उष्णता देखील नव्हती. मात्र मगरपट्टा, वडगावशेरी, चिंचवड, कोरेगाव पार्क या ठिकाणी किमान तापमान २० अंशाच्या वर होते. त्या परिसरात बऱ्यापैकी उष्णता जाणवत होती. तर जिल्ह्यातील काही भागात किमान तापमान १६-१७ अंशावर होते.
पुण्यातील किमान तापमान
माळिण : १६.८तळेगाव : १७.२शिवाजीनगर : १८.२पाषाण : १८.४एनडीए : १८.६बारामती : १९.७लोणावळा : २१.१कोरेगाव पार्क : २१.६चिंचवड : २२.३वडगावशेरी : २२.७मगरपट्टा : २३.३