सूर्यकांत किंद्रे, भोरपाण्याची टाकी असलेल्या भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत चालले आहे. मे महिन्यात असलेली परिस्थिती यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आल्याने येथील दुर्गम गावांतील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. विहिरींचे पाणी कमी झाल्याने, तसेच शिवकालीन टाक्याही आटल्याने पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली आहे. मिळेल तेथून गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. भाटघर धरणात फक्त १९ टक्के, तर नीरा देवघर धरणात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरण भागातील मळे गावच्या महादेववाडी येथील शिवकालीन विहिरीचे पाणी आटल्याने महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तर, गृहिणी, चांदवणे, कुंबळे, कांबरे खुर्दचा उंबरमाळ, कांबरे बुद्रुक, चिकणेवाडी, सुकाळेवस्ती, अशिंपी, उंबार्डे, साळुंगण, जळकेवाडी, कोंडगावची सोनारवाडी, हुंबेवस्ती, पसुरेची सणसवाडी पाण्याची गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने मिळेल तेथील गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मळे, डेरे, कुरुंजी, करंदी बुद्रुक, करंदी खुर्द, वाकांबे, गोरड, म्हशीवली, वाढाणे, आस्कवडी, जोगवडी, लव्हेरी, माजगाव, वेळवंड, जयतपाड, रांजणवाडी, गायमाळ, पसुरे या गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी कमी पडत आहे. नीरा देवघर धरण भागातील रायरीची धारांबेवाडी, धानवली व निवंगण येथे रायरेश्वर किल्ल्यावरून उताराने नळपाणीपुरवठा योजना केल्या आहेत. मात्र, जानेवारीपासून पाणी कमी पडायला सुरुवात होऊन मार्चला येणारे पाणी पूर्ण बंद झाले आहे. त्यामुळे धारांबे येथे चार हंडे वाटून घेतले जातात. पाणी बैलगाडी किंवा खासगी गाड्या, टँॅकरने धरणावरून आणावे लागत आहे. धानवलीतही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निवंगण गावातील शिवकालीन विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरीतून दररोज दोन हंडे पाणी वाटून घेतले जात आहे. अधिकचे पाणी अर्धा किलोमीटरवर असलेल्या ओढ्यावरून व दोन किलोमीटरवर असणाऱ्या गुढे येथील विहिरीवरून डोंगर चढून आणावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अशीच परिस्थिती होत असल्याचे निवंगणचे सरपंच किसन दिघे यांनी सांगितले. याच भागातील पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, शिरवली हि. मा., कुडली बु., मानटवस्ती या गावांतही तीन ते चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. 1टंचाईग्रस्त गावातून आलेल्या टँकर मागणीनुसार सदर गावात पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या वतीने संयुक्तरीत्या दौरा काढून उपलब्ध पाण्याच्या स्रोताची पाहणी करून त्यानंतरच टँॅकर देण्यात येणार असल्याचे तहसीलदार वर्षा शिंगण व गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी सांगितले. मात्र, पाहणीला वेळ कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. 2महुडे बुद्रुुकची गोरेवस्ती व हुंबे, पसुरेची सणसवाडी या गावांचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत आले आहेत. तर भाटघर धरणभागातील अनेक गावांचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वीच ग्रामसेवकांनी तयार केले आहेत. मात्र, तलाठी पंचनामा करून प्रस्तावावर सह्या करीत नसल्याने प्रस्ताव सादर करता येत नसल्याचे नागरिक सांगतात. याकडे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.
पाण्यासाठी रानोमाळ भटकंती!
By admin | Published: March 14, 2016 1:23 AM