पुणे: पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे फिक्स झाले आहे. राष्ट्रवादीकडून चेतन तुपे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप आणि मनसेकडून साईनाथ बाबर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या ३ उमेदवारांनी विकासाबाबत हडपसरचे व्हिजन सांगितले आहे.
हडपसरमध्ये २४ तास पाणीपुरवठा
पुण्याच्या पूर्व भागात अत्याधुनिक बिझनेस हबची निर्मिती केली जाईल, ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नॅनो टेक्नॉलॉजी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांचा समावेश असेल. महंमदवाडी आणि मांजरी येथे भव्य क्रीडा संकुल उभारणार, एसआरए प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविणार आहे. तरुणांसाठी व्यसनमुक्ती केंद्र, समुपदेशन केंद्र स्थापन करणार आहे. पोलिस स्टेशन्स आधुनिकीकरण/ संगणकीकरण, तसेच नागरिकांसाठी सर्व सुविधांयुक्त प्रतीक्षालय उपलब्ध करणार आहे. गृहनिर्माण संस्था, हौसिंग सोसायट्यांमध्ये सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीसाठी चालना देणार आहे. ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल, अभ्यासिका, जिमखाना आणि प्रशिक्षण केंद्रे यांसारख्या नवीन सार्वजनिक सुविधा उभारणार आहे. हडपसर मतदारसंघातील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून सहापदरी नवीन रस्ता मंजूर करून त्याच्या उभारणीस प्राधान्य दिले जाईल. हडपसर-कात्रज, हडपसर-स्वारगेट आणि हडपसर-खराडी यामधील मेट्रो मार्गाचे काम आणि हडपसर ते लोणी काळभोर या नवीन मेट्रो मार्गास मंजुरी मिळवून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल. कोंढवा- कात्रज तसेच कोंढवा- भैरोबानाला अशा दोन नव्या मेट्रो भागास मंजूर करून पूर्ण करणार आहे. वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी एआय आधारित सिग्नल बसवणार आहे. नदीपात्रातील रस्ता केशवनगर- मांजरीपर्यंत वाढवणार आहे. रिंगरोड जलद गतीने पूर्ण करणार आहे. हडपसरचा भाग पूर्ण शहरी असल्याने २४ तास पाणीपुरवठा करणार आहे. - चेतन तुपे, राष्ट्रवादी अजित पवार गट, हडपसर
प्रमुख रस्त्यांवर उड्डाणपूल
हडपसर विधानसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा-आसखेडच्या धर्तीवर मुळशी धरणातून ३ टीएमसी पाणी आणणार आहे. शिवसृष्टीप्रमाणे कात्रज घाट परिसरात शिवप्रतापगाथा प्रकल्प उभारून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास समोर आणणार आहे. हडपसर, मांजरी व कोंढवा खुर्द येथे भव्य क्रीडा स्टेडियम उभारणार आहे. या मतदारसंघात पोलिस चौकी, ठाण्यांची संख्या वाढविणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मतदारसंघ सीसीटीव्ही देखरेखीखाली आणणार असून, ड्रग्जमुक्त करणार आहे. हा मतदारसंघ कचरामुक्त करणार आहे. वाहतुकीचा ताण लक्षात घेता ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड त्वरित सुरू करून २४ महिन्यांच्या आत कार्यान्वित करणार आहे. भैरोबा नाला ते शेवाळवाडी मेट्रो प्रकल्प आणि बाहेरची वाहतूक वळवणारा दुमजली उड्डाणपूल उभारणार आहे. मगरपट्टा ते विमानतळ मेट्रो मार्ग सुरू करणार आहे. पुणे मेट्रोचा विस्तार कात्रज घाटापर्यंत करणार आहे. कात्रज चौक ते मांगडेवाडी अंडरपास करणार असून, केशवनगर चौकात उड्डाणपूल उभारणार आहे. कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे जाळे, कात्रजकरांना विश्वासात घेऊन सुयोग्य पद्धतीने मार्गी लावणार आहे. - प्रशांत जगताप, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष
रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार
हडपसरच्या विकासाचे ब्ल्यू प्रिंट करणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विचारमंथन करावे लागणार आहे. आमदार म्हणून यासाठी पुढाकार घेणार आहे. वाहतूककोंडीवर ठाम उपाययोजना करणार आहे. भैरोबा नाला ते शेवाळवाडी उड्डाणपुलाची गरज आहे. कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. भूसंपादन झाले नाही. निधीच्या अडचणी आहेत. या रस्त्यासाठीच्या सर्व अडचणी सोडवून लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर असणार आहे. हडपसर परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अंतर्गत भागातही रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी डी.पी. रस्त्यांची कामे रखडली आहेत. ही कामे तातडीने मार्गी लावणार आहे. मतदारसंघातील मुख्य चौकाचौकांत वाहतूक पोलिस व वॉर्डनची संख्या वाढविण्यावर भर देणार आहे. हडपसरसाठी नव्या महापालिकेला प्राधान्य राहणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका व राज्य शासनाशी समन्वय साधून हडपसर कचरा डेपोमुक्त करणार आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. हडपसरला मेट्रो आणणारच. ‘ससून’च्या धर्तीवर अद्ययावत रुग्णालय सुरू करणार आहे. वारकरी भवन उभारणार आहे. हडपसर मतदारसंघात राज्यस्तरीय स्पोर्टस् अकॅडमी उभारणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना मोठ्या प्रमाणावर राबवणार आहे. मतदारसंघात महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारून भव्य अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करणार आहे. - साईनाथ बाबर, मनसे