पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०० कोटींच्या निधीबाबत राज्य सरकारकडून पत्र आले आहे. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यावर वंडर सिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंतचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. पण या रस्त्यावरील भूसंपादनात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राजस सोसायटी चौकापासून पुढे हा उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढविण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा घेतला. या बैठकीपूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी रस्त्याची पाहणी केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणेे, ठेकेदार संदीप पटेल, पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कात्रज कोंढवा रस्ता ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदी केली जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. यापैकी २०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार या निधी बाबत राज्य सरकारकडून पालिकेला पत्र आले आहे. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटर पर्यंत वाढविल्यास अनेक घराच्या जागांचे भूसंपादन करावे लागणार नाही.
या रस्त्याच्या रुंदीकरण्यासाठी धारीवाल, बधे आणि माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या जागाचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यांच्याच जागा जास्त आहेत. त्यामुळे या जागा मालकांशी येत्या सोमवारी पुन्हा बैठक आयोजित केली आहे अशी माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.