पुणे : नित्याची वाहतुक कोंडी, त्यात सुरू असलेले उड्डाणपूलाचे काम, रस्त्यावरील अतिक्रमणे व मोठ मोठे खड्डे अशी ओळख असलेला सिंहगड रस्ता दुरूस्त करून तो पुण्यातील आदर्श रस्ता करण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे.
सिंहगड रस्ता येत्या सात दिवसात खड्डेमुक्त करण्यात येईल असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केला आहे. ते म्हणाले, पुणे शहरातील जे पंधरा रस्ते आदर्श रस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सिंहगड रस्त्याचाही समावेश आहे. सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे हे मान्य आहे. उड्डाणपूलाचे काम या ठिकाणी चालू असल्याने, या उड्डाणपूलाच्या कामाच्या खालील रस्त्याची देखभाल व दुरूस्ती करण्याचे काम महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडे आहे. परंतु आता पथ विभागाच्या माध्यमातूनच हाही रस्ता व लगतचा रस्ता दुरूस्त केला जाणार आहे.
राजाराम पुलापासून आंबेगाव पुलापर्यंतच्या भागात नेहमी होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी या भागात येताना व जातानाच्या मार्गावर रस्त्यावर नो पार्किंग करण्यात येणार असून, तसे फलक लावण्यात येणार आहे. याचबरोबर या भागात रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असून, रस्त्याच्या लगतच्या व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमणही हटविण्यात येणार आहे. कुठल्याही व्यापाऱ्याला त्याची वाहने या भागात रस्त्यावर लावू दिली जाणार नाही. जेणे करून या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अधिकचा रस्ता मिळेल याची काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान पाऊस चालू असला तरी येत्या सात दिवसात या रस्त्यावर कोल्डमिक्सचा वापर करून सर्व खड्डे बुजविण्यात येतील असेही ढाकणे यांनी सांगितले.