पुणे : पुणे विमानतळावर माल वाहतुकीसाठी जागा कमी पडत आहे. संरक्षण दलाची सुमारे अडीच एकर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात ही जागा मिळवून माल वाहतुक वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली. भविष्यात कोरोनाची लस पुणे विमानतळावरून जायला हवी, या दृष्टीने प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.
विमानतळ सल्लागार समितीची या वर्षातील पहिली बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीला खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनिल टिंगरे, विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांच्यासह महापालिका, पोलिस, पीएमपी, उद्योग आदी क्षेत्रातील समिती सदस्य उपस्थित होते. समितीमध्ये मराठा चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता, एअर मार्शल (निवृत्त) भुषण गोखले, अभिजित पवार, बादशाहा सय्यद व उज्ज्वल केसकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बापट यांनी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, कार्गोसाठी अडीच एकर हवी आहे. जागा हस्तांतरणात काही अडचणी आहेत. संरक्षण दलाशी याबाबत चर्चा झाली आहे. जागेअभावी माल वाहतुक होत नसल्याने उद्योजकाना आपला माल मुंबईला पाठवाला लागतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे यांदर्भात लवकर संरक्षण मंत्र्यांना भेटणार आहोत. तसेच सिग्नल फ्री कॉरीडॉरवरही चर्चा झाली. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण, सिग्नल, चौक अशा अडचणी आहेत. रस्ते रुंदीकरण, पार्किंग, नवीन टर्मिनल इमारतीवरही चर्चा करण्यात आली. ---------------दररोज सुमारे ९ हजार प्रवासीसध्या दररोज ९ हजार प्रवासी ये-जा करत आहेत. २०१८-१९ मध्ये ही संख्या वर्षाला ९० लाख एवढी होती. त्यानंतर त्यामध्ये मागील वर्षी ८० लाखापर्यंत घट झाली. कोरोना संकटामुळे विमान उड्डाणाला मर्यादा असल्याने जवळपास दररोज ९० विमानांचीच ये-जा होत आहे. पुर्वी हा आकडा १८० च्या जवळपास होता. ------------