जेजुरी : पुरंदरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, मनसे, भाजपा या पक्षांकडून प्रत्येक गावात थेट संपर्क साधून वाड्यावस्त्यांवर बैठका, कोपरा सभांद्वारे प्रचार केला, तर शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी प्रत्येक गणात जाहीर सभा घेऊन प्रचाराची सांगता केली. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, छुप्या पद्धतीने मतदारांच्या गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यात काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, मनसे, भाजपा काही ठिकाणी बंडखोर यांच्यात बहुरंगी निवडणूक होत आहे. गेली १० वर्षे पूर्वीचा जनता दल आणि आजचा मनसे व राष्ट्रवादी काँगे्रस यांच्या युतीची सत्ता आहे. निवडणुकीत मात्र ते वेगवेगळे लढले होते. निवडणुकीनंतर ते एकत्र आले होते. जिल्हा परिषदेसाठी एकूण १८, तर पंचायत समितीसाठी ३८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रसला बंडखोरांची लागण झाल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडलेली असली, तरीही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभा घेऊन वातावरण तयार केले आहे. काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही गावोगावी सभा घेऊन मतदारांशी संपर्क साधला आहे. सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही प्रत्येक गणात सभा घेऊन मतदारांना आवाहन केले आहे. शेवटच्या दिवशी सेना वगळता इतर कोणत्याही राजकीय पक्षाने कोणताही राज्यपातळीवरील नेता प्रचाराला आणला नव्हता. (वार्ताहर)
भेटीगाठींवर भर : निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By admin | Published: February 20, 2017 1:53 AM