पुणे : पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत भारतीय संगणक प्रणाली आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले. माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ संदीप गोडबोले लिखित ‘पिलिग्रिम्स इन द डिजिटल वर्ल्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन बहल यांच्या हस्ते झाले. या वेळी टाटा कन्सल्टन्सीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सचिन लोढा आणि अदिती गोडबोले उपस्थित होते. बहल म्हणाले की, ‘दहशतवादाचा नवीन चेहरा सायबर हल्ल्यामार्फत जगापुढे आला आहे. संपूर्ण जग या अंतर्गत हल्ल्याच्या बचावासाठी यंत्रणा उभी करण्यात गुंतली आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या धोरणांवर आणि प्रयत्नांवर या हल्ल्याद्वारे नुकसान पोहोचवले जाते. हा मार्ग दहशतवाद्यांनादेखील सोयीचा असल्याने सायबर हल्ल्यांपासून देशाचा डेटा वाचविणे जिकिरीचे झाले आहे. डिजिटल समाज निर्मितीच्या ध्यासापोटी आपण आपली सुरक्षा धोक्यात तर आणत नाही ना, हे पाहणे गरजेचे ठरते. न्यायप्रक्रियेशी संबंधित यंत्रणेपासून गुन्ह्याच्या शोधात गुंतलेल्या पोलीस यंत्रणेपर्यंत सर्वच स्तरावर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सायबर हल्ल्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्की कोणत्या प्रकारचे पुरावे सादर करणे अपेक्षित आहे, या मूलभूत मुद्द्यापासून त्या प्रशिक्षणाचा प्रारंभ करावा लागेल.’ संदीप गोडबोले यांनी पुस्तकामागील भूमिका सांगितली.
‘पिलिग्रिम्स इन द डिजिटल वर्ल्ड’मधून सायबर हल्ल्यावर टाकला प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:57 AM
पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे‘डेटा सिक्युरिटी’ हा सर्वांत सायबर हल्ल्यावरील परिणामकारक उपायन्यायप्रक्रियेशी संबंधित यंत्रणेपासून पोलीस यंत्रणेपर्यंत प्रशिक्षणाची आवश्यकता : संजय बहल