लासुर्णे : यंदाच्या वर्षी इंदापूर तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याबरोबरच जनावरांच्या चाºयाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळेल तो चारा चढ्या दराने विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उन्हाळ्यात भीषण चाराटंचाई जाणवणार असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे.
आॅक्टोबरपासूनच तालुक्यात काही भागात चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चाराटंचाईच्या झळा शेतकºयांना सोसाव्या लागत आहेत. तालुक्याच्या बाहेरून मिळेल तेथून हिरवे कडवळ, मकवण व वाळलेला कडबा जादा दराने आणून जनावरांना घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पुढील ८ महिने पाऊस पडेपर्यंत जनावरे जगवायची कशी या चिंतेने शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. यावेळी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील तुकाराम देवकाते या शेतकºयाने सांगितले, की चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याअभावी दूधवाढीवरही गंभीर परिणाम होऊन दूध उत्पादक शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहेत. म्हणून आम्ही पुढील पाच सहा महिने जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून मिळेल त्या ठिकाणावरुन प्रतिगुंठा हजार ते बाराशे रूपये याप्रमाणे, तर एकरी चाळीस हजाराहून अधिक दराने चारा खरेदी करत आहोत.
शेतातून घरापर्यंत चारा आणण्यासाठी वाहतूक व तोडणीसह इतर खर्च धरला तर ४५ हजार ते ५० हजारांपर्यंत खर्च होत आहे. परंतु खर्चाकडे न बघता सध्याच्या दुष्काळात मुकी जनावरे जगवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.