पुणे : पुण्यात रविवारी मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने याचा फटका विमान वाहतुकीला बसला. रविवारी पुणे (लोहगाव) विमानतळावर उतरणारी १० विमाने आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने पुणे विमानतळावर उतरली. तर दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या दोन विमानांना खराब हवामानामुळे मुंबई येथे उतरावे लागले. रविवारी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत पुणे विमानतळावर विमानांची वाहतूक प्रभावित झाली. ९ वाजून १४ मिनिटांनी धुक्याची तीव्रता कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली.
रविवारी सकाळी पुणे विमानतळ परिसरात १०० मीटरपेक्षा कमी दृश्यमानता असल्याने १० विमानांना उशीर झाला. धुक्यामुळे विमान वाहतुकीला फटका बसण्याची आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. शुक्रवारीदेखील धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने वीसहून अधिक विमानांना फटका बसला होता. डिसेंबरमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने सकाळच्या सत्रातील विमानांच्या वेळेत थोडा बदल करणे गरजेचे झाले आहे. डायव्हर्ट झालेल्या विमानांच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शुक्रवारी ३ विमाने मुंबईला व एक विमान हैदराबादला आले होते. तिथून पुणे गाठणे खर्चिक व वेळखाऊ आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातल्या विमानांच्या वेळेत बदल झाला तर प्रवाशांची गैरसोय होणार नाही.