पिंपरी : ‘तुम्हाला करणीची बाधा झाली आहे. मी सांगतो ते करा अन्यथा आयुष्यातून उठाल’ अशी भीती घालून वाहतूक व्यावसायिकाची आर्थिक लुबाडणूक करणारा भोंदूबाबा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पिंपरी पोलिसांनी त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सुभाष वसंतराव वाकोडे ऊर्फ राजू पुजारी (वय ४४) असे या भोंदूबाबाचे नाव आहे.या भोंदूबाबाचा निगडीतील ट्रान्सपोर्टनगरीत वावर होता. तेथे ट्रकचा नंबर पाहून ट्रकचालकाला तो भीती दाखवायचा. या वाहनाला अपघात होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. या वाहनाचा मालक कोण आहे, त्याचा मोबाइल क्रमांक दिल्यास त्यांच्याशी संपर्क साधतो, असे म्हणून तो संबंधित वाहनचालकास मोबाइलवर संपर्क साधून आपली भेट घेण्यास सांगायचा. अशाच पद्धतीने फिर्यादी मोहन अप्पाराव भिंगोले भोंदूबाबाच्या गळाला लागले. कोणीतरी करणी केली आहे. काही महिन्यांतच त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत, असे सांगून हे संकट दूर करण्यासाठी मंतरलेल्या अंगठ्या घेण्याची तो गळ घालत होता. त्यामुळे भिंगोले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. ‘अंनिस’च्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव व कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी सतर्कता दाखवून पिंपरी पोलिसांना ही माहिती दिली. भोंदूबाबाने फिर्यादींना पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भेटण्यास बोलावले होते. समितीच्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलिसांनी सापळा रचला. फिर्यादीकडून पैसे घेत असताना त्यास पकडले. (प्रतिनिधी)करणीची भीती घालून उकळायचा पैसेकरणीची बाधा झाली आहे, वेळीच उपाययोजना करावी लागेल, अशी भीती घालून भोंदूबाबा वेळोवेळी पैसे उकळायचा. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे भिंगोले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे मदत मागितली. घडला प्रकार त्यांना सांगितला. अलीकडच्या काळात तर तो त्यांना मंतरलेल्या अंगठ्या घेण्याची गळ घालत होता. वेळीच करणी दूर करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत, तर अवघ्या दोन महिन्यात वेड्यासारखे फिरण्याची वेळ येईल. असे सांगून तो पैशाची मागणी करत होता.अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पिंपरीतील झोपडपट्टीत राहणारा हा भोंदूबाबा उदरनिर्वाहासाठी अनेक वर्षांपासून असे उद्योग करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भोंदूबाबा जाळ्यात
By admin | Published: March 08, 2017 5:03 AM