टाकळी हाजी : घरात तमाशाची मोठी परंपरा. आजोबा राज्यातील नामवंत तमाशा कलावंत तर आई मोठी नृत्यांगना.. राहूटीतच जन्म झाल्याने तमाशाचे संस्कार लहानपणापासूनच झाले. आपला मुलगा तमाशात न राहता मोठा अधिकारी व्हावा अशी तिची इच्छा असल्याने शिक्षणाची आवड जोपासत संविदणे येथील तमाशा कलावंत दिनेश मधूकर सकट हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला असून फौजदार होऊन त्याने त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण केले आहे. संविदणे (ता.शिरूर) येथील तमाशा कलावंत युवकाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून त्यांच्या निवडीने सर्वसामान्य माणसांमध्ये कलाकार झाला फौजदार अशीच चर्चा रंगली आहे. तमाशा कलावंत दिनेश सकट याचा जन्म तमाशाच्या राहुटीमध्येच झाला. दिनेशचे आजोबा राज्यातील मोठे तमाशा कलावंत. आईसुद्धा तमाशातील मोठी नृत्यांगना. लहाणपणापासून त्यांच्यावर तमाशाचे संस्कार झाले. मात्र, असे असतानाही त्यांने शिक्षणाची आवड जोपासली. त्यांच्या आईलाही आपला मुलगा या क्षेत्रात न राहता मोठा अधिकारी व्हावा असे वाटत असल्याने शिक्षणासाठी नेहमी त्यांनी दिनेशला प्रोत्साहन दिले. दिनेशने तमाशामध्ये डान्सर, वाद्य काम आणि सोंगाड्या या भुमिका करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. दिनेशची याची आई नंदा सकट या रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळात नृत्यांगना म्हणून काम करत असत. त्यांचा वारसा घेऊन दिनेश शाळेच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये रघुवीर खेडकर, दत्ता महाडिक पुणेकर, सर्जेराव जाधव या तमाशामध्ये काम करत होता. तमाशात काम करता करता त्याने पाबळ ( ता. शिरूर) येथे बी. कॉमपर्यतची पदवी मिळवली. पदवीपर्यंतचा दिनेशचा शिक्षणाचा प्रवास खडतर राहिला. त्यात त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले.२०१६ मध्ये आई नंदा यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटूंबावर मोठे संकट कोसळले. मात्र, तमाशामध्ये काम न करता आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा ही आईची इच्छा असल्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिनेशने राज्य आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना अतिशय बिकट परिस्थितीतून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिनेश उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक झाला. तसेच विशाल मोटे हा शेतकरी कुटुंबातील युवक असून नाजुक परिस्थितीवर मात करत मनाशी असलेले स्वप्न उराशी बाळगुन पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
तमाशा कलावंतांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही वेगळा आहे. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा झालेला विकास तसेच राजाश्रय नसल्यामुळे आज तमाशाच्या राहूट्या तसेच फड ओस पडत आहे. या कलावंतांच्या नशीबी नेहमी उपेक्षेचे जीणे असताना दिनेशने मिळवलेले यश सर्वसामान्यांना प्रेरणा देणार आहे. ................... माझा जन्म तमाशात राहूट्यात झाला. आई आणि आजोबा मोठे तमाशा कलावंत होते. कलेची आवड जोपासत शिक्षणही पूर्ण केले. आईला मी नेहमी मोठा अधिकारी व्हावे असे वाटत होते. ती गेल्यानंतर तीचे स्वप्न मी पूर्ण करण्याचे ठरवले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत आणि राहूट्यात काम करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. आज ही परीक्षा पास झाल्याने खूप आनंद होत आहे. - दिनेश सकट