पुणे : प्रत्येक प्रांतातील रूढी, परंपरा आणि चालीरीतींचा मेळ असलेले लोकसंगीत हा भारतीय संगीताचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. लोकसंगीताने हिंदी चित्रपट संगीताला देखील मोठे योगदान दिले आहे, असे मत ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी व्यक्त केले. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘चढ गयो पापी बिच्छुवा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदी आणि मराठी चित्रपटातील लोकसंगीतावर आधारित हा विशेष कार्यक्रम अमरेंद्र धनेश्वर यांनी प्रात्यक्षिक आणि विश्लेषणात्मक विवेचनाद्वारे सादर केला. या वेळी भारतीय विद्याभवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. धनेश्वर म्हणाले, ‘लोकसंगीत ही त्या त्या प्रांताची ओळख असते. सामूहिक वादन, गायन आणि नृत्य हे लोकसंगीताचे सूत्र आहे. समूहाला एका धाग्यात बांधून ठेवण्याची ताकद लोकसंगीतामध्ये असते. पारंपरिक वाद्यांचा वापर होत असल्यामुळे आणि त्यातील शब्द हे रोजच्या जगण्याशी संबंधित असल्यामुळे लोकसंगीत मनाला भिडते.’ धनेश्वर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातील लोकसंगीतावर आधारित गीते सादर करून त्याचे विवेचन केले. भैरव रागातील लोकगीताचा अंश सादर करून त्यांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर भूप रागातील बंदिश, पिलू रागातील मुखडा आणि सारंग रागातील तरंग सादर करून रसिकांची दाद मिळवली. तसेच महाराष्ट्रातील ओवी, गुजरातमधील गरबा, पंजाबमधील भांगडा असे लोकसंगीताचे अनेक प्रकार हिंदी, मराठी तसेच त्या त्या प्रांतिक भाषांच्या चित्रपटात समाविष्ट झाल्यामुळे या लोकसंगीत प्रकारांना एक व्यापक व्यासपीठ मिळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. अरविंद परांजपे (तबला) आणि उमा जठार (व्हायोलिन) यांनी सुरेल साथसंगत केली.
लोकसंगीत भारतीय संगीताचा ठेवा : पंडित अमरेंद्र धनेश्वर; रसिकांना लोकसंगीताची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:25 PM
प्रत्येक प्रांतातील रूढी, परंपरा आणि चालीरीतींचा मेळ असलेले लोकसंगीत हा भारतीय संगीताचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. लोकसंगीताने हिंदी चित्रपट संगीताला देखील मोठे योगदान दिले आहे, असे मत ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देभारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे ‘चढ गयो पापी बिच्छुवा’लोकसंगीत ही त्या त्या प्रांताची ओळख, सामूहिक वादन, गायन आणि नृत्य हे लोकसंगीताचे सूत्र