लोणावळा : जातीयवादी भाजपा व शिवसेना सरकारला पायउतार करण्याकरिता प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळवा असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपस्थितीमध्ये लोणावळ्यात काँग्रेसचा मेळावा आज संपन्न झाला. लोणावळ्यात काँग्रेस मेळाव्यात माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, रामभाऊ बराटे, सोमनाथ दौंडकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, विलास बडेकर, यादवेंद्र खळदे, निखिल कविश्वर, प्रमोद गायकवाड, भानुदास खळदे, गणेश काजळे, पुष्पा भोकसे, हाजीमलंग मारिमत्तु यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मावळ तालुक्यासह विविध भागातील काँग्रेस पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबतची नाराजी बोलून दाखवली. यावर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, केवळ मतांचे विभाजन झाले म्हणून २०१४ च्या निवडणुकीत देशात केवळ 39 टक्के मते मिळालेला जातीयवादी भाजपा पक्ष सत्तेत बसला व मत विभाजन झाल्याने ६१ टक्के मते मिळालेले इतर सर्व पक्ष विरोधात बसले. यावेळी मात्र मतांचे विभाजन टाळण्याकरिता देशातील समविचारी २१ पक्ष काँग्रेसच्या सोबत आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखिल आहे. जातीयवादी सरकारला सत्तेतून पाय उतार करण्यासोबत दिल्लीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याकरिता लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे. याकरिता सर्व मतभेद बाजुला ठेवून प्रत्येक कार्यकत्यार्चे आघाडीचा धर्म पाळायचा आहे. जी खंत कार्यकर्त्यांची आहे तीच आमची देखील आहे मात्र, ही वेळ आपापसात वाद घालण्याची नसून जातीयवादी पक्षांना रोखण्याची व मतांचे विभाजन टाळण्याची असल्याने काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आघाडीच्या प्रचारयंत्रणेत सहभागी व्हावे असा पक्षादेश आला आहे, त्याचे काटेकोर पालन करावे असे पाटील यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष संजय जगताप, मोहोळ, बराटे यांनी देखिल आघाडीचे काम करण्याच्या सुचना मेळाव्यात केल्याने पुणे जिल्ह्यातील आघाडीतील वाद संपुष्टात आला आहे.
विधानसभा जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील जसा राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा जागांमध्ये इंटरेस्ट आहे तसा आमचा विधानसभांच्या जागेत आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या 21 जागा आहेत यापैकी ज्याठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी मागणी केली असून याबाबत राहुल गांधी व शरद पवार जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल अशी चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झाली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.