लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गरिब व गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पुण्यातील एकमेव अनुदानित अभिनव आर्किटेक्चर महाविद्यालय सुरू राहिले पाहिजे. राज्यशासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता असून या महाविद्यालयाचा वैभवशाली वारसा जपला गेला पाहिजे. त्यासाठी येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे माजी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे व आमदार शरद रणपिसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुण्यातील भारतीय कला प्रसारणी सभेच्या कॉलेज आॅफ आर्किटेक्चरमध्ये (अभिनव आर्किटेक्चर) प्रवेश मिळावा, अशी इच्छा असते. मात्र, आर्किटेक्चर कौन्सिलच्या नियमावलीत बसत नसल्याने महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अभिनव अर्किटेक्चरकडे सध्या अपुऱ्या सुविधा आहेत, असे कौन्सिलकडून सांगितले जात असले तरी पुण्यातील सुमारे २० महाविद्यालयांपैकी अभिनव आर्किटेक्चरमधील विद्यार्थी विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत. विद्यार्थ्यांचा निकाल पाहता अद्याप महाविद्यालय बंद करण्याची वेळ आलेली नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हे महाविद्यालय वाचविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टोपे म्हणाले, अभिनव आर्किटेक्चर कॉलेजला मोठा वारसा आहे. पुण्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालाय असल्याने येथे गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. विद्यार्थी हितासाठी राज्यशासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाने संबंधीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाविद्यालय वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
अभिनव आर्किटेक्चरसाठी अधिवेशनात पाठपुरावा
By admin | Published: July 17, 2017 4:29 AM