लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यात निर्बंध लागू केले असतानाही नागिरकांकडून त्याचे पालन केले जात नाही. अद्यापही वेळ गेली नसून, शासनाने लागू केलेले निर्बंध पाळा. अन्यथा लॉकडाऊन अधिक कडक करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि.16) रोजी पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सोमवारी विभागीय आयुक्तांना ससूनच्या डॉक्टरासंदर्भात बैठक घेण्यास सांगितली आहे. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अडचणीच्या काळात त्यांनी सहकार्य करावे, सरकार म्हणून काम करणारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकारण न आणता कोरोनाबाधितांचा जीव जाणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत पवार म्हणाले, रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानींसोबत मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनबाबत चर्चा केलीय, व्हेंटिलेटरसंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे.
सर्वांना रेमडेसिविर देण्याची गरज नाही
रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत पवार म्हणाले, सर्वांना रेमडेसिविर देण्याची गरज नाही. परंतु, अनेक डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना गरज नसतानाही रेमडेसिविर इंजेक्शन आणायला सांगतात. याचे उदाहरण सांगताना ते म्हणाले, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा भाचा रुग्णालयात होता. त्याला रेमडेसिविरची गरज नव्हती. मात्र तरीही डॉक्टरांनी त्याला सांगितले इंजेक्शन घ्यायलाच हवे. तुझे मामा वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्यामार्फत ते मिळवा.
----
महाआघाडी सरकार स्थिरच
महाआघाडी सरकार सुरुवातीपासूनच स्थिर सरकार असून, कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. जोपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे आहेत या सरकारला तोपर्यंत किंचितसुद्धा काहीही होत नाही.
------
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- पुण्यात ऑक्सिजन बेड वाढवण्याची आवश्यकता
- मुकेश अंबानींनी ऑक्सिजन देण्याचं आश्वासन
- निधीची कमतरता कमी पडू देणार नाही
- रेमडेसिविरचा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू